नेत्यांचे छत्रपतींना वंदन... पण, गुणांचे आचरण कुठंय?

एकीकडे राज्यातील जनता जयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे स्मरण अन्‌ वंदन करत असताना जळगाव जिल्ह्यातील नेते नित्याच्याच एकमेकांवर तोंडसुख घेण्याच्या व्यवसायात गुंतलेले असणे छत्रपतींच्या साम्राज्यात कधीही मान्य होणे नाही..
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajsakal

एकीकडे राज्यातील जनता जयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे स्मरण अन्‌ वंदन करत असताना जळगाव जिल्ह्यातील नेते नित्याच्याच एकमेकांवर तोंडसुख घेण्याच्या व्यवसायात गुंतलेले असणे छत्रपतींच्या साम्राज्यात कधीही मान्य होणे नाही.. राजकारणाचे ‘दुकान’ चालविण्यासाठी मंत्री अन्‌ नेत्यांनी शब्दबाण सोडणे क्रमप्राप्त असले तरी या बाणांनी खालची पातळी गाठू नये, अशी अपेक्षा असणे बेहतरच...

शनिवारी रयतेच्या राजाला वंदन करण्याचा, त्याचा जन्मोत्सव साजरा करण्याचा सुदिन होता. हिंदवी स्वराज्य स्थापना आणि विस्तारासाठी आपले जीवन खर्ची घालणाऱ्या या राजान साम्राज्य विस्तारही अगदी तत्त्वाने केला.. म्हणून राजांच्या निर्वाणाची वार्ता ऐकून त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबही राजांचे कौतुक करत हळहळला.. राजकीय नेतृत्वाचे शिवरायांहूनही अधिक आदर्श उदाहरणे दुसरे असूच शकत नाही.

दुर्दैवाने देशभरात आणि विशेषत: राजांच्या या महाराष्ट्र मुलखातच नेत्यांनी राजकारणाचे ‘दुकान’ चालविताना अवलंबलेली नीती राजांना अपेक्षित करणारी तर नाहीच, उलट त्यांचा अवमान करणारी ठरावी. राज्य पातळीवरील नेत्यांनी पातळी सोडल्याचे गेल्या काळातील किस्से ताजेच आहे. सेनेचे वाचाळवीर वैश्‍विक प्रवक्ते असोत की भाजपचे कथित भ्रष्टाचारविरोधी नेते.. साऱ्यांचीच भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला मारक. मग, जळगाव जिल्ह्यातील नेतेही त्यात मागे कसे राहू शकतील? महिनाभरापूर्वी जामनेर- मुक्ताईनगरच्या दोघा ‘भाऊं’मधील शाब्दिक चिखलफेकीचा अंक पार पडला, त्यावर समाजमनातून टीकाही झाली. त्यातून नेते सावरतील असे वाटले होते..

मात्र, काल- परवा नगर जिल्ह्यातील कार्यक्रमात खडसेंचा ‘डाकू’ म्हणून उल्लेख करताना मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरलीच. अर्थात, पाटलांच्या वक्तृत्वाची ती स्टाईलच आहे. पण, ते आता काही मुलुखमैदान तोफच नाहीत तर मंत्री आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बोलताना तेवढे तारतम्य ठेवणे आवश्‍यकच. पण, तेवढे भान त्यांना कधी राहत नाही. त्यावर शांत बसतील ते खडसे कसले? त्यांनीही गुलाबरावांना ‘उच्च शिक्षित..निर्व्यसनी’ म्हणत ‘चोरों को सारे नजर आते है चोर’ अशी कोपरखळी लगावलीच.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय नाट्य राज्यात गाजत असतात. खडसे- गुलाबरावच नाही तर दोन- चार दिवसांत जळगाव मनपातील नगरसेवक फोडाफोडीवरुन गुलाबराव- गिरीश महाजनांमध्येही टोलेबाजी सुरु आहे. खरेतर नगरसेवक फोडण्याबाबत एकमेकांवर आरोप करणेच मुळात गैर आहे. कारण, जळगावातील नगरसेवकांना फोडण्याइतके ‘महान’ कुणीही नाही. ही नगरसेवक मंडळीच इतकी महान आहे की त्यांना वाटेल तेव्हा, वाटेल त्या नेत्याच्या मांडीवर जाऊन ते बसू शकतात. पण, त्यासाठी आपली मांडी वापरु द्यायची की नाही, आणि किती वापरु द्यायची हे या नेत्यांनाच ठरवायचे आहे.

नेत्यांनी महत्त्वाकांक्षी अन्‌ पक्षांनी विस्तारवादी असणं स्वाभाविकच. पण, त्यासाठी राजकारणाच्या कुठल्याही थराला जाणे शिवरायांच्या तत्त्वानुसार वर्ज्यच. म्हणून छत्रपतींना वंदन करताना केवळ हाती भलेमोठे भगवे ध्वज घेऊन, फुगड्या खेळून चालणार नाही. तर नेतृत्वाचा आदर्श म्हणून त्यांची तत्त्वे प्रत्यक्ष अंगीकारणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना वंदन ठरेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com