Leopard Attack News : मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला ‘छोबीपछाड’ | Leopard trying to grab farmer neck leopard run after attack Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Attack

Leopard Attack News : मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला ‘धोबीपछाड’

Jalgaon News : तालुक्यातील धोबी वराड गावात बुधवारी (ता. १७) रात्री बिबट्याने शेतात बांधलेली गाय फस्त केली. पुन्हा गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला चढवतो.

मान जबड्यात घेण्याच्या बेतातील बिबट्याला ४० वर्षीय शेतकरी मोठ्या ताकदीने झटकून फेकतो. ग्रामस्थ येतात अन्‌ बिबट्या पळ काढतो.

गुरुवारच्या या थराराने धोबी वराड गावात दहशत निर्माण झाली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Leopard trying to grab farmer neck leopard run after attack Jalgaon News)

असा घडला थरार...

जखमीचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, धोबी वराड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय आशिष सुधाकर सुरळकर गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात असताना, अचानक बिबट्याने हल्ला केला.

आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला बिबट्याने पंज्याने वार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला, जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले.

शेतातील गाय फस्त

जखमी आशिष सुरळकर यांच्याकडून रुग्णालयात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले, की रात्री अकरा ते बाराच्या सुमारास लहू जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय याच बिबट्याने फस्त केली असून, महिन्यापूर्वी वासरूही पळवून नेले होते. धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.