Jalgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने सासऱ्याची गळा चिरून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Jalgaon Crime News : प्रियकराच्या मदतीने सासऱ्याची गळा चिरून हत्या

जळगाव : किनगाव (ता. यावल) येथील साठवर्षीय वृद्धाचा गळा चिरून (Murder) हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) समोर आली होती. (main suspect in Kingaon murder case along with daughter in law arrested jalgaon crime news)

गुन्हा दाखल होऊन अठरा तासांतच स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचा उलगडा करून प्रमुख संशयित तरुणासह मृत वृद्धाच्या सुनेला अटक केली आहे. मृत सासरा सुनेकडे शरीरसुखाची मागणी करत असल्यावरून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

किनगाव येथील साठवर्षीय ट्रकचालक भीमराव शंकर सोनवणे यांचा मृतदेह शुक्रवारी पहाटे गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली आढळून आला होता. मृत भीमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद याच्या तक्रारीवरून यावल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह त्यांच्या तांत्रिक पथकाने ग्रामस्थांशी सलग संवाद, नातेवाइकांची माहिती, सोबतच घटनास्थळावर मिळून आलेल्या पुराव्यांचे अवलोकन करीत निरीक्षक किशन नजन पाटील यांनी मृताच्या सूनबाईला विश्‍वासात घेतले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सुनेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नाव घेताच तिने माहिती देण्यास सुरवात केली. सासरे भीमराव सोनवणे माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली तिने दिली.

बहिणीचा मानलेला मुलगा खुनी

सुनेची मोठी बहीण उदळी (ता. रावेर) येथे राहत असून, तिचा मानलेला मुलगा जावेद शहा ऊर्फ जय अलीशहा (वय ३२, रा. प्रतिभानगर, वरणगाव. हल्ली मुक्काम उदळी, ता. रावेर) याच्या संपर्कात सून असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सुरवातीला वरणगाव नंतर उदळी (ता. रावेर) येथे संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोघा संशयितांना अटक करून यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.