Latest Jalgaon News | प्रमुख रस्त्यांचे काम मार्चपर्यंत पूर्णत्वाचे उद्दिष्ट; बांधकाम विभागाचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The work of the road from Court Chowk to Ganesh Colony has been started, and under this work, stone work is in progress in front of New Maratha College.

Jalgaon : प्रमुख रस्त्यांचे काम मार्चपर्यंत पूर्णत्वाचे उद्दिष्ट; बांधकाम विभागाचे नियोजन

जळगाव : शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांवरून नागरिकांच्या भावना तीव्र होत असताना, शासनाने दिलेल्या ४२ कोटींच्या निधीतून होत असलेली प्रमुख रस्त्यांची कामे मार्च २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या उपलब्धतेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांचे नियोजन केले आहे. (Major road work targeted for completion by March Planning of construction department Latest Jalgaon News)

जळगाव शहरातील रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रमुख रस्त्यांसह सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रामुख्याने रस्त्यांच्या व अन्य कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीपैकी महापालिकेने ४२ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. शासनाने या निधीत कपात करून तो ३८ कोटींवर आणला आहे. त्यात शासनाचे ७० टक्के म्हणजे जवळपास २६ कोटी व महापालिकेने ३० टक्के हिस्सा म्हणजे १२ ते १३ कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यातून शहरातील प्रमुख रस्त्यांसह ४९ प्रकारची कामे केली जाणार आहेत.

अडचणींनी रखडले काम

काही ना काही अडचणी, तांत्रिक बाबी, रस्ते खोदकाम व महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रशासकीय कारणांमुळे ही कामे लांबत गेली. मध्यंतरीच्या काळात मविआ सरकारने या ४२ कोटींच्या निधीस स्थगितीही दिली. आता या निधीचा मार्ग मोकळा होऊन कामेही सुरू झाली आहेत.

पहिला हप्ता प्राप्त

शासनाकडून २६ ते २७ कोटींचा निधी तीन टप्प्यात मिळणार आहे. त्यापैकी पहिला ८ कोटींचा हफ्ता आठवडाभरात प्राप्त होईल. महापालिकेने आपला हिस्सा म्हणून ५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे.

हेही वाचा: Nashik : रामतीर्थ सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची व्हावी स्थापना!

सात रस्त्यांची कामे सुरू

बांधकाम विभागाच्या निधीच्या हमीनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी सात रस्त्यांची कामे प्रत्यक्षात सुरूही झाली आहेत. यात प्रामुख्याने कोर्ट चौक ते गणेश कॉलनी, काव्यरत्नावली चौक ते रामानंदनगर व पुढे वाघनगरपर्यंतचा रस्ता, गाडगेबाबा चौक ते पठाणीबाबा दर्गा, एसटी वर्कशॉप ते कालिंकामाता मंदिर यांसह अन्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

असे आहे नियोजन

३८ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन बांधकाम विभागाने मक्तेदार एजन्सीला करून दिले आहे. शासनाकडून तीन टप्प्यांत निधी प्राप्त होणार असून, मक्तेदाराने बांधकाम विभागाकडून निधी प्राप्तची हमी मिळाल्यानंतर पहिल्या हप्त्यातील रकमेच्या ७० टक्के खर्चाचे काम पूर्ण करून बिले सादर करावीत, ती मिळाल्यानंतर उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासह दुसऱ्या टप्प्यातील निधीची हमी घेत पुढच्या टप्प्यातील कामे पुन्हा ७० टक्के करावीत, असे नियोजन आहे. या रचनेनुसार शासनाकडून निधीची उपलब्धता जशी होईल, त्यानुसार ही कामे केली जाणार आहेत.

"शासनाकडून जसा निधी प्राप्त होईल आणि त्यात महापालिकेचा हिस्सा जसा मिळेल, त्यानुसार ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, निधीचा पहिला हप्ता व महापालिकेचा हिस्सा काही दिवसांतच प्राप्त होईल. त्याआधीच आपण प्रमुख कामे सुरू केली आहेत. सर्व ३८ कोटींच्या निधीतील कामे मार्च २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे." -प्रशांतकुमार येळाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

हेही वाचा: Nashik : आठवडे बाजारात भाजीपाला मातीमोल