
Crime News : दारू पार्टीसाठी जंगलात नेले अन् केली हत्या; संशयीत गजाआड
जळगाव : निमखेडी महादेव मंदिराजवळ प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) याचा खून करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी उमाळा येथील जंगलातून सायंकाळी ताब्यात घेतले. मृत प्रमोदने बायकोवर भानामती (जादूटोणा) करून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याच्या संशयातून सुनील ऊर्फ साबीर नियामतखाँ तडवीने त्याचा मित्र सत्यराज नितीन गायकवाड याच्या मदतीने खून केल्याची माहिती अटकेतील संशयितांनी दिली.
हेही वाचा: Jalgaon News : बसमध्ये राहिलेली 1 किलो चांदीची बॅग सराफास परत; ST आगार कर्मचाऱ्यांची तत्परता
एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रमोदचे वडील सुरेश शेट्टी यांनी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर सोमवारी सकाळी निमखेडी शिवारात प्रमोदचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.
उमाळा वनक्षेत्रात कारवाई
मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, नाना तायडे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील यांनी थेट सुनील तडवीची सासरवाडी चिंचखेडा (ता. जामनेर) गाठले. तेथून उमाळा वनक्षेत्रात संशयित दडून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने उमाळा जंगलात शोध घेतला. तेथे सुनील ऊर्फ साबीर नियामतखाँ तडवी (वय २८), सत्यराज गायकवाड (२६, रा. गणेशनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, दोघांना आधिक तपासासाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
हेही वाचा: Jalgaon Crime News : व्यावसायासाठी माहेरून तीन लाख आण; सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ
दरम्यान, मेहरुण शिवारातील वाय. डी. पाटील शाळेजवळील रहिवासी प्रमोद शेट्टी व त्याचा पूर्वाश्रमीचा भाडेकरू सुनील तडवी यांच्यात सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. प्रमोदचे सुनीलच्या पत्नीशी सलोख्याचे संबंध होते. सुनीलची पत्नी नेहमीच माहेरी निघून जात होती. त्यावरून दोघांमध्ये एकदा कडाक्याचे भांडणही झाले होते. प्रमोदने आपल्या बायकोवर भानामती (जादूटोणा) केल्याचा दाट संशय सुनीलला होता. नेहमीच्या भांडणाला कंटाळून शेट्टी कुटुंबीयांनी सुनील तडवी याला घर खाली करायला लावले होते. तेव्हापासून तो शेजारी दुसऱ्या घरात राहण्यासाठी गेला होता.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
हेही वाचा: Crime News : साडी, बिंदी अन् बांगड्या घालून तरुणाचा गळफास; विचित्र घटनेने पोलिस चक्रावले
दारू पाजून हत्येचा पॅटर्न
शनिवारी प्रमोद शेट्टी विद्यापीठात कामावर गेला. दुपारी ड्यूटी संपल्यावर नेहमीप्रमाणे त्याला सुनीलने दारू पार्टीचे आमंत्रण दिले. प्रमोद, सुनील व सत्यराज गायकवाड असे तिघेही खोटेनगर स्टॉपकडून दुचाकीने निमखेडी शिवारातील भोलेनाथ मंदिरावर पोचले. तेथे प्रमोदला यथेच्छ दारू पाजली. नशेत असताना, धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरण्यात आला. त्यानंतर शरीरावर वार करून नंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली. गेल्या वर्षभरात झालेल्या सात ते आठ खुनाच्या घटनेत अशाच पद्धतीने मैत्री करून, यथेच्छ दारू पाजत दगडाने ठेचून मारण्याचा जळगाव पॅटर्न प्रचलीत झाला आहे.