..अन् अधिकारी, शास्त्रज्ञ पोचले बांधावर 

farmer
farmer

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील वर्डी येथील काही ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीच्या ३२०६ या वाणाची पेरणी केली होती. मात्र, योग्य मशागत करूनही ज्वारीच्या कणसांना पूर्णपणे दाणेच भरले नसल्याने शेतकऱ्यांनी सदोष बियाण्याबाबत कृषी विभाग व शेतकरी संघटनेकडे तक्रार केली होती. तसेच ‘सकाळ’कडे कैफियत मांडली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची कृषी विभागाने तत्काळ दखल घेत बुधवारी (ता. २४) कृषी अधिकाऱ्यांनी वर्डी येथे शेतात भेट देऊन ज्वारी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. 
वर्डी (ता. चोपडा) येथील साहेबराव पाटील, वासुदेव पाटील, कैलास पाटील, पांडुरंग धनगर तसेच साहेबराव पाटील आदी शेतकऱ्यांनी हायटेक हायब्रीड सीड्स या कंपनीचे ३२०६ हे वाण पेरले होते. वेळेवर खत, व्यवस्थापन, कीटकनाशक, पाणी व्यवस्थापन करूनही ज्वारीच्या कणसांना दाणेच भरलेले नाहीत. विरळ दाणे आले असल्याने या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तक्रारदार शेतकरी त्यांच्या शेतावर जाऊन कृषी विज्ञान केंद्र पालचे कृषी शास्त्रज्ञ अतुल पाटील, हायटेक सीड्स विभागीय व्यवस्थापक चेतन गिरासे, तालुका कृषी अधिकारी आर. आर. चौधरी, पंचायत समिती कृषी अधिकारी डी. एम. शिंपी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदींनी याची पाहणी केली असता सदर ज्वारी पिकाचे कणसे पूर्णपणे भरलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे दिसून आले. हा ज्वारीचा वाण रब्बीत पेरणी लायक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
प्रशासनाने कंपनीस शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या वेळी प्रगतिशील शेतकरी, विनोद धनगर, लहुश धनगर, किरण गुर्जर, सचिन सोनवणे, अविनाश शिंदे, कैलास पाटील, साहेबराव पाटील, ओंकार धनगर, संदीप धनगर, भूषण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यानुसार अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल. 
- डी. एम. शिंपी, पंचायत समिती, कृषी अधिकारी, चोपडा 

शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची टक्केवारीनुसार भरपाई मिळू शकते. सरसकट नुकसान नाही. शेतकऱ्यांकडून नाव, उतारा, बिल, गट नंबर, क्षेत्र, बॅग संख्या याची माहिती घेऊन व पंचनामा, तसेच शास्त्रज्ञ अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल. 
- आर. आर. चौधरी, कार्यालयीन कृषी अधिकारी, चोपडा 

दरवेळेस बियाणे कंपनी शेतकऱ्यांना सदोष बियाणे पुरवठा करतात. कृषी विभागाने शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर वेळीच बंदी आणावी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. 
- संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, जळगाव 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com