२१ वाळू गटांचे लिलाव; पंधरा दिवसात प्रक्रिया

देवीदास वाणी
Saturday, 19 December 2020

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून वाळूचे लिलाव रखडले आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने अजूनही जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाणी वाहत आहे. परिणामी, नद्यांमध्ये चांगली वाळूही जमा झाली आहे.

जळगाव : जिल्ह्यात वर्षभरापासून अडकून पडलेल्या वाळू गटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील २५ वाळू गटांपैकी २१ वाळू गटांच्या लिलावांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मंजुरी दिली आहे. आगामी पंधरा दिवसांत या वाळू गटांच्या लिलावांना सुरवात होईल. 

नक्‍की वाचा- रात्री गप्पा मारल्या अन पहाटे घेतला गळफास

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून वाळूचे लिलाव रखडले आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने अजूनही जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाणी वाहत आहे. परिणामी, नद्यांमध्ये चांगली वाळूही जमा झाली आहे. जिल्ह्यातील वाळूला चांगली मागणी असते. लिलाव बंद असल्याने वाळूमाफियांद्वारे वाळूचोरी होत होती. त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. नदीपात्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

प्रस्‍ताव मंजुरी रखडलेली
राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र, समितीने प्रस्ताव मंजूर केलेले नसल्याने लिलाव रखडले होते. २५ वाळू गटांच्या लिलांवापैकी २१ वाळू गटांच्या लिलावांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मंजुरी दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये वाळू लिलावांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे तब्बल वर्षभरापासून रखडलेला वाळू लिलावाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. 

क्‍लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्‍या घडामोडी जाणून घेण्यासाठी 

वाळूमाफियांमध्ये उत्सुकता 
२१ वाळू गटांच्या लिलावांना मंजुरी मिळाली असल्याने नेमक्या कोणत्या वाळू गटांना मंजुरी मिळाली, याबाबत वाळूमाफियांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू ठेके घेणारे, डंपरचालक ठिकठिकाणी याच विषयाची चर्चा करताना दिसून आले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news auction of sand groups