गिरणाचे आवर्तन सुटले अन्‌ कर्मचारी घामाघूम 

सुधाकर पाटील
Friday, 18 December 2020

गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. 
 

भडगाव (जळगाव) : गिरणा पाटबंधारे विभागात एकूण ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील तब्बल ३२१ पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अवघ्या १९८ जणांच्या खांद्यावर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्राची व त्यावरील एक हजार ६६४ किलोमीटर लांबीचे कालवे, वितरिकांची जबाबदारी येऊन ठेपली आहे. यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. 
निम्म्या जळगाव जिल्ह्याला गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो, तर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्र धरणाच्या पाण्यावर भिजते. मात्र, गिरणा धरणाचा एवढा मोठा आवाका असताना या विभागाचा मंजूर पदे व रिक्त पदांचा ताळेबंद केला तर मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने गिरणा पाटबंधारे विभागाला कारभार हाकावा लागत आहे. 

पदे केव्हा भरणार? 
गिरणा पाटबंधारे विभागात विविध ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदांवर नियुक्तीच झाली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ३२१ वर आला आहे. त्यामुळे अवघ्या १९८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच ५१९ जणांचा कार्यभार सुरू आहे. पर्यायाने अतिरिक्त कामांमुळे कामात ढिसाळपणा येत असल्याचे चित्र आहे. यामुळे ही रिक्त पदे केव्हा भरली जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

लोकप्रतिनिधींनी आग्रह धरावा 
या रिक्त पदांबाबत शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असून, रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे. लोकप्रतिनिधींनीही याबाबत शासनदरबारी आवाज उठविणे आवश्यक आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे धरणात पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शेतकऱ्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागतो. 

पाणीचोरी रोखणे अवघड 
तुटपुंज्या कर्मचारीसंख्येमुळे गिरणा धरणाच्या कालव्यांना पाणी सोडल्यावर लक्ष ठेवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. पाणीचोरी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभाग अक्षरशः हतबल होऊन गेला आहे. कार्यरत कर्मचारी सध्या पाण्याचे आवर्तन सुटल्याने ते सांभाळताना घामाघूम झाल्याचे चित्र आहे. 

पदांची स्थिती 
मंजूर पदे..........५१९ 
भरलेले पदे.......१९८ 
रिक्त पदे..........३२१ 

गिरणा पाटबंधारे विभागातील रिक्त पदांमुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही पदे आवश्यक बाब म्हणून तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आपण जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत. यापूर्वी याबाबत त्यांना निवेदन दिले आहे. 
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhadgaon girna yhe mill rotated