esakal | स्‍वतःहून दिली लिफ्ट; मारहाण करत बँकेत नेत पासबुकवर मारली एंट्री

बोलून बातमी शोधा

robbery}

त्याने दुचाकीस्वाराला बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगताच ‘बस मी सोडून देतो’ असे सांगत त्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकावर घेऊन न जाता अज्ञातस्थळी नेण्यात आले.

jalgaon
स्‍वतःहून दिली लिफ्ट; मारहाण करत बँकेत नेत पासबुकवर मारली एंट्री
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील चार भामट्यांनी १७ वर्षीय मुलास मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. तर अजून पैसे हवे म्हणून मुलाला बँकेत नेले. पासबुकवर एंट्री मारल्यानंतर पैसे नसल्याचे पाहून चारही भामटे बँकेतून पसार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी तहसील कार्यालयाजवळ घडली. मुलाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला. 

नितीन बाविस्कर (वय १७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) शुक्रवारी दुपारी बसने जळगावात आला. शिवाजीनगर येथे उतरल्यानंतर रेल्वेरुळ ओलांडून तो तहसील कार्यालयाजवळ आला. तेथे त्याने दुचाकीस्वाराला बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगताच ‘बस मी सोडून देतो’ असे सांगत त्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकावर घेऊन न जाता अज्ञातस्थळी नेण्यात आले. तेथे चोरट्याचे इतर तीन साथीदार उपस्थित होते. या चौघांनी नितीनला मारहाण करून त्याच्याजवळील दहा हजारांचा मोबाईल व पाचशे रुपये काढून घेतले. 

स्टेट बँकेत घेऊन गेले चोरटे 
आणखी काही आहे का? यासाठी अंगझडती घेतली असता पाठीवरच्या बॅगेत स्टेट बँकेचे पासबुक मिळून आले. बँकेत किती रक्कम आहे, याचीही विचारणा केली. परंतु, खात्यात पैसे नसल्याचे नितीनने सांगितले. तरी त्याला दुचाकीवर बसवून स्टेडियमसमोरील स्टेट बँकेत आणले. तेथे रीतसर नितीनच्या पासबुकची एंट्री करुरून बॅलेन्स तपासला. खात्यात काहीच पैसे नसल्याचे दिसताच चारही भामट्यांनी बँकेतून पळ काढला. तत्पूर्वी त्यांनी नितीनला पोलिसांत न जाण्याची धमकीही दिली. भामटे पळून गेल्यानंतर नितीनने शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सहाय्यक फौजदार विजय निकुंभ अधिक तपास करीत आहेत.