‘बर्ड फ्लू’बाबत दक्षता..जळगाव जिल्ह्यातही पोल्ट्री फॉर्ममध्ये तपासणी
जळगाव जिल्ह्यात कुक्कुट पक्ष्यांची संख्या १२ ते १५ लाखांपर्यंत असून, सर्व पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील नवापूर, नंदूरबार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, पोल्ट्री फॉर्ममधील पक्ष्यांची तपासणी करण्यात येत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात कुक्कुट पक्ष्यांची संख्या १२ ते १५ लाखांपर्यंत असून, सर्व पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्हच
जिल्ह्यातील रावेर, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव आणि जामनेर आदी तालुक्यांत पक्षी मृत आढळले होते. या मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नवापूर येथे जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागातर्फे १६ पथके (रॅपिड रिस्पॉन्ड टीम) रवाना करण्यात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव नाही. मात्र, सतर्कतेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री पक्ष्यांची तपासणी करण्यात आली आहे. कुक्कुट पालकांना जैविक सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शत करण्यात येत आहे. नवापूर येथे जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागातर्फे १६ पथके रवाना करण्यात आली आहेत.
-श्यामकांत पाटील, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग
जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’मुळे पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून पशुसंवर्धन विभाग स्तरावर दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. चिकन वा अंडी योग्य प्रकारे शिजवून घेतल्यास अपाय होत नाही. परंतु कच्चे मांस हाताळणी करताना मास्क वापरणे आवश्यक आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव
संपादन ः राजेश सोनवणे