
विमानतळावर सकाळी एक अनोळखी दूरध्वनी आला. विमानतळाच्या प्रवेशकक्षामध्ये एका सुटकेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुरक्षा व्यवस्थापकांनी तत्काळ प्रवाशी व कर्मचाऱ्यांना इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या.
जळगाव : जळगाव विमानतळाच्या प्रवेश कक्षात एका सुटकेसमध्ये बॉम्ब ठेवला आहे; असा संदेश असणारा दूरध्वनी खणखणला आणि विमानतळावरील अधिकारी व संपूर्ण यंत्रणेची पळापळ सुरू झाली. यामध्ये प्रवाशी व कर्मचाऱ्यांना विमानतळाची इमारत तत्काळ सोडायला सांगितले. या सर्व धावपळीत श्वान पथकाच्यावतीने देखील तपासणी करण्यात आली.
एक अनोळखी दूरध्वनी
विमानतळावर सकाळी एक अनोळखी दूरध्वनी आला. विमानतळाच्या प्रवेशकक्षामध्ये एका सुटकेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुरक्षा व्यवस्थापकांनी तत्काळ प्रवाशी व कर्मचाऱ्यांना इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर काही क्षणात इमारत खाली झाली. याच दरम्यान सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर 15 ते 20 मिनिटात अधिकारी, कर्मचारी पथकासह विमानतळावर पोहचले. यामध्ये श्वानपथकही दाखल झाले.
बॅग नेली कुलींग कक्षात
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मागर्दशाखाली बॉम्ब शोध पथकाने विमानतळाच्या इमारतीची अत्याधुनिक उपकरणांद्वारे तपासणी केली. यात श्वान पथकामार्फत बॉम्ब सदृष्य वस्तूचा शोध घेण्यात आला. यात आढळून आलेल्या बॉम्ब सदृष्य वस्तूला विमानतळावर असलेल्या बॉम्ब कुलिंग कक्षात नेऊन ती नष्ट करण्यात आली.
आणि सुटकेचा निश्वास
विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरी विमान सुरक्षा यंत्रणा, नागरी विमान मंत्रालय यांच्यावतीने 26 डिसेंबरला जळगाव विमानतळावर बॉम्ब शोध सरावाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये यंत्रणा किती सतर्क आहे, याची खात्री करण्यात येऊन बचाव कार्यादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींविषयी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. परंतु, संपुर्ण प्रकाराचा तपास केला असताना हे एक मॉक ड्रिल असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकारात आपत्कालीन स्थितीत यंत्रणा कसे काम करते, याचे यावेळी निरीक्षण करण्यात आले. या वेळी आढळून आलेल्या त्रुटींबद्दल आढावा घेण्यात येऊन यात सुधारणा करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, बॉम्ब शोध पथकाचे प्रमुख आर.डी. मोरे, विमानतळ प्राधीकरणाचे मुख्य सुरक्षा अधिकारी अमित तिवारी, आयबी शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मगर, नीलेश वाटपाड, श्याम पाटील यांनी ही मोहीम राबविली.
संपादन ः राजेश सोनवणे