गाडीतून पडला टीव्ही; सारेच म्हणाले आमचा, मग लागली बोली

रईस शेख
Tuesday, 9 February 2021

जिल्‍हा परिषद ऊर्दू कन्याशाळेचे मुख्याध्यापक शेख मजीद शेख करीम शासकीय अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी टीव्ही खरेदीला जळगावला आले होते. प्रत्येकी २९ हजारांचे दोन एलईडी टीव्ही खरेदी करून ते अडवादला निघाले हेाते.

जळगाव : अडावद येथील ऊर्दू कन्या शाळेसाठी दोन टीव्ही घेऊन जाणाऱ्या सुसाट वाहनाच्या छतावरून टीव्ही खाली पडला. दुचाकीस्वाराने तो उचलला, रस्त्याने ये- जा करणाऱ्यांनी तो, टीव्ही मला दे...आमचा आहे, असे म्हणत भांडण केले. एकाने तीन हजार, तर दुसऱ्याने पाच हजारांत टी.व्ही. मागितला मात्र नंतर या सर्व जांगडगुत्त्यातून तो ३० हजारांचा टीव्ही एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोचला व पोलिसांनी खऱ्या मालकाचा शोध घेत टीव्ही त्याच्या स्वाधीन केला. 
अडावदच्या जिल्‍हा परिषद ऊर्दू कन्याशाळेचे मुख्याध्यापक शेख मजीद शेख करीम शासकीय अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी टीव्ही खरेदीला जळगावला आले होते. प्रत्येकी २९ हजारांचे दोन एलईडी टीव्ही खरेदी करून ते अडवादला निघाले हेाते. बस नसल्याने कालीपिलीमध्ये (एमएच १९, एस ११३३) बसताना चालकाला त्यांनी एक प्रवाशाचे अतिरिक्त पैसे घे, मी दोन्ही टीव्ही सेाबत घेऊनच गाडीत बसतो, असे सांगितले. मात्र चालकाने ऐकले नाही आणि दोन्ही टीव्ही छतावरील कॅरिअरमध्ये ठेवले. अतिरिक्त प्रवासी बसवून सुसाट गाडी धावत असल्याने दोनपैकी एक टीव्ही रस्त्यावर पडला. हा टीव्ही अभिलाष साळुंखे या दुचाकीस्वारास दिसल्याने त्याने तत्काळ उचलला. खोक्यात एलईडी टीव्ही सुस्थितीत होता. 

टीव्हीवरून हाणामारीची तयारी 
रस्त्यावर सापडलेला टीव्ही आपल्याला मिळावा म्हणून अभिलाष साळुंखे या तरुणाशी अनेकांनी वाद घालले. अभिलाषने उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांना फोन लावला आणि टीव्ही मागणाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावले. 

...अन्‌ टीव्ही खऱ्या मालकाडे 
सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफूर तडवी यांनी कालीपिली चालकांना निरोप दिला. दुपारपर्यंत टीव्हीचा शोध घेत टॅक्सीचालक ज्ञानेश्‍वर सोनवणे व मुख्याध्यापक शेख मजीद जळगावला आले. शाळेच्या नावे असलेल्या टीव्हीचे बिल वरील बॅच नंबरची खात्री करून त्यांना टीव्ही सोपविण्यात आला. अतिरिक्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीचालक ज्ञानेश्‍वर सोनवेणे याचे वाहन ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news car drop tv and police station