
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक यापूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या कामासाठी ते आज सकाळी पोलीस ठाण्यात आले होते.
चाळीसगाव (जळगाव) : येथील पोलीस ठाण्याजवळच भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकावर माजी नगरसेविकेच्या पती व मुलाकडून आज सकाळी साडेअकराच्या सुमारास धारदार शस्त्रास्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या माजी नगरसेवकावर औरंगाबादला दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या कामासाठी ते आज सकाळी पोलीस ठाण्यात आले होते. पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर जवळच असलेल्या एका हॉटेलवर थांबलेले असताना माजी नगरसेवक जगदिश महाजन व त्यांचा मुलगा आले. सुरवातीला त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.
अन् धारदार शस्त्राने वार
पर्यावसन हाणामारीत होऊन यात प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकारानंतर चौधरी हे पळतच पोलिस ठाण्यात गेले. त्यांना सुरवातीला येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव अधिक होत असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबादला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली, तिचा पंचनामा केला असून येथील काही दुकानदारांचे जाबजबाबही घेतले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
संपादन ः राजेश सोनवणे