अल्‍पवयीन मुलीचा लावला विवाह; वर- वधूच्या आई- वडीलांसह लग्‍न लावणाऱ्यावर गुन्हा

राजु कवडीवाले
Thursday, 21 January 2021

पिडीत अल्पवयीन मुलीचे वय 15 वर्ष 3 महीने असुन, विवाहितेस नवरा मुलगा शाहरुख पटेल याने वेले (ता. चोपडा) येथे मारहाण केल्याच्या घटनेनंतर तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी 19 डिसेंबरला येथील शाहरूख राजु पटेल यांचा जबाब नोंदविला होता.

यावल (जळगाव) : खेळण्या, बागळण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या पंधरा वर्ष तीन महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी नवरा मुलगा, मुलगी व मुलाचे आई- वडील व लग्न लावून देणारे (मौलवी) काझी या सहा जणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना येथे शहरातील बोरावल गेट परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 
शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे राजु लतीफ पटेल (मुलाचे वडील), जरीना राजु पटेल (मुलाची आई), शाहरुख राजू पटेल (नवरा मुलगा) व मुलीचे आई- वडील आणि विवाह लावणारे हाजी समद पटेल (रा. बोरावल गेट, यावल) या सर्वांनी मिळुन अल्पवयीन मुलीचा विवाह (निकाह) 20 ऑगस्‍ट 2020 रोजी बोरावल गेट परिसरात मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे लावुन दिल्याचे उघडकीस आले. 

नवऱ्याने मारहाण केल्‍यानंतर उघड
जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी यांच्याकडील कार्यालयास 11 जानेवारीच्या प्राप्त पत्रासोबत जोडलेल्या पत्रांचे अवलोकन करता या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलीचे वय 15 वर्ष 3 महीने असुन, विवाहितेस नवरा मुलगा शाहरुख पटेल याने वेले (ता. चोपडा) येथे मारहाण केल्याच्या घटनेनंतर तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी 19 डिसेंबरला येथील शाहरूख राजु पटेल यांचा जबाब नोंदविला होता. मुलगी अल्पवयीन असतांना तिचे आई- वडील, मुलाचे वडील राजु पटेल व आई जरीना राजु पटेल यांनी विवाह लावून दिला. 

आजच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
जळगाव येथील जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत निळे आणि येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना राजेंद्र आटोळे यांनी आज येथे पोलिसात तक्रार दिल्याने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे पोट कलम 1 व 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news child marriage small girl and fir ragister