esakal | चोपड्यात जनता कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविला; बाजार समिती अनिश्‍चित कालावधीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

janta curfew coronavirus

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. याकरीता नगरपालिकांच्या हद्दीत हे निर्बंध लागू केले आहेत.

चोपड्यात जनता कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविला; बाजार समिती अनिश्‍चित कालावधीसाठी बंद

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : जिल्ह्यासह तालुक्यातील कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून, कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी तालुका हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. तालुक्यात २२ ते २४ मार्चच्‍या मध्‍यरात्रीपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आदेश प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी सुमीत शिंदे यांनी दिले आहेत.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. याकरीता नगरपालिकांच्या हद्दीत हे निर्बंध लागू केले आहेत. यात बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, इतर सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी- विक्री केंद्र देखील बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, सभा मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल्स मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद राहणार आहेत.

सामाजिक संघटना व राजकीय पदाधिकारी यांची मागणी
तालुक्यात दररोज येणाऱ्या रुग्ण संख्या तिनशेच्यावर येत असल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कोरोना बाधित रुग्ण गृह विलगिकरणाच्या नावावर बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतांना दिसून येत आहे. यावर प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे. रुग्णांना बेड मिळत नाही; तर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नंबर लावावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आमदार लता सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, शेतकरी कृती समितीचे एस बी. पाटील, व्यापारी संघटना प्रतिनिधी, मनसे पदाधिकारी यांनी यावर तात्काळ काहीतरी कार्यवाही व्हावी. तसेच शासकीय दुसरे कोविड सेंटर सुरू करावे याबाबत तहसीलदार अनिल गावित यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या लॉकडाऊन ने काही फरक पडत नसल्याने हा लॉकडाऊन कालावधी कमीत कमी सात दिवसांचा एक आठवडा भर असावा अशी मागणी होती. यावर पुन्हा सलग तीन दिवस वाढवून मिळाल्याने आता पाच दिवसांचा जनता कर्फ्यु झाला आहे.

बाजार समिती अनिश्चित कालावधीसाठी बंद
चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक असल्याने व तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारी व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्यामुळे त्याच्या संख्यात वाढ झालेले आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून आलेल्या अर्जानुसार चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रीचे व्यापार व्यवहार अनिश्चित काळासाठी जो पर्यत रुग्ण संख्या कमी होत नाही, तोपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बाजार समिती सभापती कांतीलाल पाटील यांनी दिली आहे.

जनत कर्फ्यूला सहकार्य करा : आमदार सोनवणे
चोपडा मतदारसंघातील जनतेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चोपडा शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारीवर्ग यांनी प्रशासनाच्यावतीने २२ ते २४ मार्च दरम्‍यान जनता कर्फ्युला सहकार्य करावे. या जनता कर्फ्युचा संचारबंदीचा मुख्य उद्देश रहदारी थांबवून कोरोनाची साखळी तोडणे आहे. कोरोनाची साखळी तोडणे त्यादृष्टीने कृपया चोपडा मतदारसंघातील व्यापारीवर्ग व नागरिकांनी नियमांचे पालन करावे. जेणेकरुन आपल्यासह सर्वांचाच जीव वाचवण्याची ही लढाई यशस्वी करण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले आहे. 

ांसंपादन ः राजेश सोनवणे

loading image