‘कलेक्टर’, ‘एस.पी.’ पिशवी घेवून बाजारात जातात तेव्हा

देवीदास वाणी
Tuesday, 5 January 2021


साहेब म्‍हटले म्‍हणजे नोकर- चाकर, घरातील सर्व कामे तेच करणार. पण जिल्‍ह्‍याचे बॉस असलेले जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक चक्‍क हातात पिशवी घेवून भाजी मंडईत जातात..विक्रेत्‍याला भाव विचारत भाजी खरेदी करतात. हे एकले तर नवलच वाटेल ना. पण असे झाले; सोबत कोणी नोकर नाही, पण साहेबांनी भाजीपाला खरेदी केला.

जळगाव : ‘जिल्हाधिकारी’, ‘पोलिस अधिक्षकांनी स्वतः पिशवी हातात घेवून चक्क भालीपाला खरेदी केल्याने शेतकऱ्यासह कृषी विभागाचे अधिकारी अवाक झाले. निमित्त होते ‘विकेल ते पिकेल’ योजनेतंर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राच्या उद्‌घाटनाचे. 

हेपण वाचा- सात वर्षाची शिक्षा भोगून दोन महिन्यापुर्वीच आला घरी; पुन्हा केले बलात्‍काराचे कृत्‍य

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या विशेष प्रयत्नाने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारीत शेतमाल विक्री सुरू करण्यात आली. त्यावेळी केंद्राचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव डॉ. प्रविण मुंडे, कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते पोलिस वसाहतीत झाले. 

२४ स्‍टॉलवर बरेच काही
जिल्‍ह्‍यातून सेंद्रीय पध्दतीने पिकवलेली केळी, पपई, पेरु, मेहरुणची बोरे त्याचप्रमाणे भाजीपाल्यामध्ये हादगा फुले, शेवगा, भरीत वांगे, कांदा, मशरुम त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील शुध्द मध, केळी पिकावर प्रक्रोया केलेले पदार्थ, शुध्द गीर गाईचे देशी तुप याचे उत्पादक शेतकऱ्यांचे २४ स्टॉल लावले होते. या माध्यमातून आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता. त्यापैकी जवळपास ९० ते ९५ हजार रुपयांचा पोलिस वसाहतीतील नागरिकांनी या ठिकाणी येवून शेतमाल खरेदी केला. 

क्‍लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्‍या घडामोडी जाणून घेण्यासाठी

आठवड्यातून दोन दिवस बाजार
योजनेंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याव्दारे उत्पादीत शेतमाल थेट विक्रीद्वारे ग्राहकास उपलब्ध होणार आहे. याठिकाणी पोलीस बसाहतीतील कुटुंबाना उच्चप्रतीचा शेतमाल मिळाल्याने समाधान व्यक्‍त केले. दर आठवड्यातून दोन दिवस शेतमाल विक्रीसाठी नियोजन करण्याकरीता यशोदाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक निलेश पाटील, आव्हाणे गावाचे प्रगतशील शेतकरी समाधान पाटील हे करतील. सहाय्यक पोलिस आयुक्त कुमारचिंता, अतिरीक्त पोलीस आयुक्त चंद्रकांत, बॅंक ऑफ बडोदाचे प्रादेशिक व्यवस्थापक अरुण मिश्रा, सहाय्यक महाव्यवस्थापक नाबार्ड श्री. श्रीकांत झांबरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक राजेश देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news collector abhijit raut and police officer market vegetable