esakal | ‘घाबरणे’ नव्हे, काळजी घेणे हा उपचार 

बोलून बातमी शोधा

Care is the cure

विरंगुळा करण्यासाठी पुस्तके वाचन, मित्र, नातेवाईकांशी संवाद करत रहा. कुठलीही लक्षणे दिसली तरी लागलीच टेस्ट करून घ्या, स्वतःच स्वतःबाबत निर्णय घेऊ नका. तो अंगलट येऊ शकतो, काळजी घ्या. 

‘घाबरणे’ नव्हे, काळजी घेणे हा उपचार 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चोपडा (जळगाव) : कोरोनाविषयी भीती घालवायची असेल तर काटेकोर पालन करा. खूप अभ्यास करूनही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, त्याचप्रमाणे खूप काळजी घेऊनही कोरोना झाला तर तुमचे मन मान्य करीत नाही. ताप आला तर तो व्हायरल आहे, खोकला आला तर थंड पाणी पिण्याने झाला, असा गोड गैरसमज आपण करतो, ही अमान्य करण्याची स्थिती बंद करा. कुठलीही लक्षणे दिसली तर तत्काळ टेस्ट करा. कोरोना वर ‘घाबरणे’ हा उपचार नसून काळजी घेणे हा उपचार असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सतीश पाटील (जळगाव) यांनी दिला. 
चोपडा येथे शिक्षकांचे ऑनलाइन समुपदेशन करताना ते बोलत होते. ‘सकाळ’ने चोपडा तालुक्यात कोरोनामुळे १५ शिक्षकांचा बळी, शिक्षकांना समुपदेशन, आधाराची गरज’ असे वृत्त प्रकाशित केले होते. यावर तहसीलदार अनिल गावित, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांनी या चर्चेचे आयोजन केले होते. यात १५६ शिक्षकांनी सहभाग घेतला. शिक्षक वर्ग हे दुसऱ्याचा अहवाल बघून तुलना करतात. तुमची मन:स्थिती, आत्मविश्वास ठेवला तर आजारातून निश्चितच बाहेर पडता येईल. विरंगुळा करण्यासाठी पुस्तके वाचन, मित्र, नातेवाईकांशी संवाद करत रहा. कुठलीही लक्षणे दिसली तरी लागलीच टेस्ट करून घ्या, स्वतःच स्वतःबाबत निर्णय घेऊ नका. तो अंगलट येऊ शकतो, काळजी घ्या. 

विलगिकरण म्हणजे आराम 
शिक्षक हा समाज, विद्यार्थी यांच्या संपर्कात आल्याने, इतर ठिकाणी जाण्या-येण्याने जास्त संख्येने बाधित झालेत. या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा नवीन स्ट्रेन धोकादायक होता. आधी दोन - तीन दिवस ताप आल्याने याबाबत काहींनी गैरसमज केला. त्यामुळे संधी न मिळता मृत्यूचे प्रमाण वाढले. कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये आराम महत्त्वाचा असतो. विलगीकरणाचा अर्थच म्हणजे आराम आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन या स्ट्रेनमध्ये तेवढे उपयोगी ठरत नाही, असे मत डॉ. दीपक पाटील यांनी मांडले. 

‘स्कोअर’वर स्थिती अवलंबून नाही  
एचआरसीटीनुसार रुग्णांवर ट्रीटमेंट केली जात असली तरी स्कोअरवर पेशंटची स्थिती अवलंबून नसते. हा स्ट्रेन वेगळ्या प्रकारे ॲटॅक करीत आहे. पॅचेस मोठे असले तरी स्कोअर १ ते २ असतो. स्कोअरच्या बाबतीत गैरसमज आहे. समान स्कोअरचे रुग्ण बरे होण्यास वेगवेगळा कालावधी लागतो. अवघ्या ३ ते ४ दिवसांत रुग्ण खराब होत आहे. छातीत इन्फेक्शन असते. चालणे, फिरणे, बोलणे टाळा. यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ शकते. काही ग्रामीण भागातील लोक मलेरिया, टायफॉइड रक्ताची चाचणी करतात, हे चुकीचे असल्याचे डॉ. शरद पाटील यांनी सांगितले. 

लस प्रत्येकाला बंधनकारक
लसीकरण हे खूप मोठे हत्यार आहे. यासाठी लस प्रत्येकाने घ्यायचीच आहे. मागील लाटेच्या तुलनेत १४ दिवसानंतर रुग्णांना त्रास होत नव्हता, पण या दुसऱ्या लाटेत १८ व्या, १९ व्या दिवशी सुद्धा त्रास होत आहे. घरी गेल्यावर रुग्णाने कमीत कमी १० दिवस तरी दररोज ऑक्सिजन लेव्हल मोजावी. एकदा बाधित झाल्यावर दुसऱ्यांदा बाधित होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सध्या उपचारास ही रुग्ण लवकर प्रतिसाद देत नसल्याने अडचणी वाढल्या असल्याचे डॉ. अमित हरताळकर म्हणाले.