कोरोनाची लस घेण्यास ३७ टक्‍के कर्मचाऱ्यांची नकार घंटा

देवीदास वाणी
Sunday, 17 January 2021

आरोग्य कर्मचारी कोरोना काळात अग्रभागी होते. यामुळे शासनाने प्राधान्याने त्यांना अगोदर लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र ३७ टक्के कर्मचाऱ्यांनी या-ना त्या कारणांनी लस घेणे टाळले. 

जळगाव : जिल्ह्यात कोविड लसीकरणास शनिवारपासून सुरवात झाली. सुरवातीस आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, इतर स्टाफला लसीकरण करण्यात येत आहे. शनिवारी पहिल्या दिवशी २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणास नकार दिला. आरोग्य कर्मचारी कोरोना काळात अग्रभागी होते. यामुळे शासनाने प्राधान्याने त्यांना अगोदर लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र ३७ टक्के कर्मचाऱ्यांनी या-ना त्या कारणांनी लस घेणे टाळले. 

जिल्ह्यात सात केंद्रांवर लसीकरणास शनिवारपासून सुरवात झाली. त्यात जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजीनगरातील जैन रुग्णालय, चोपडा, जामनेर उपजिल्हा रुग्णालय, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २४ हजार ३२० लसींचे डोस आले आहेत. 

आठवड्यातून चार दिवस लसीकरण
नेमण्यात आलेल्‍या केंद्रांवर आठवड्यातून चार दिवस रोज शंभर जणांना लसीकरण होईल. लसीकरणापूर्वी संबंधितांची आरेाग्य तपासणी होईल. त्याची ओळख पटवून आधारकार्डाची तपासणी होईल. त्याची माहिती संगणकावर फीड करून नंतर संबंधितांना लसीकरण होईल. अर्धा तास लस दिलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. जिल्ह्यात जसजशा लसी उपलब्ध होतील, तसतशी लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. एकूण ७०० जणांना लसीकरण होणे आवश्‍यक होते. त्यापैकी ६३ टक्के लसीकरण झाले. ३७ टक्के जणांनी लसीकरणास नकार दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus covaxin start mission but employee refusal