‘होम क्वारंटाइन’ पद्धत बंद होणार; तर लॉकडाउनचीही शक्‍यता 

home quaranatine
home quaranatine

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या विस्फोटाजवळ येऊन पोचली आहे. कोरोना नियमांचे पालन नागरिक करीत नाहीत, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले व ज्यांना औषधी देऊन ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचा सल्ला देण्यात आला असे नागरिकच बाजारात, गर्दीच्या ठिकाणी फिरून ‘सुपर कोरोन स्प्रेडर’ ठरत आहेत. यामुळे रुग्णांना होम क्वारंटाइन ठेवणे बंद करण्याचा विचार जिल्हा आरोग्य विभाग व प्रशासन करीत आहे. 
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ५) एकाच दिवश पावणेआठशे रुग्ण आढळून आले. कोरोना संसर्ग नियमांचे पालन न केल्याचा हा परिणाम असून, जिल्ह्यात जणू कोरोनाची दुसरी लाटच आली आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बंद केलेली कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करून त्यात खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन, सॅनिटायझर, औषधींची उपलब्धता करण्यात येत आहे. डॉक्टर, नर्सेसला पुन्हा कोरोनावर उपचारासाठी तैनात करण्यात आले आहे. 

तर लॉकडाउन अटळ
जानेवारीत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र, फेब्रुवारी व आता मार्चमध्ये लग्नसराई, राजकीय पक्षांच्या बैठका, सभांमुळे एकाच ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी वाढली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले असते, तर कोरोना आटोक्यात राहिला असता. मात्र, आता तसे चित्र दिसत नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाईच होणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच राहिली तर पुन्हा लॉकडाउन अटळ आहे. 

कोविड सेंटर सुरू करणार
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात तीन वॉर्ड आरक्षित करण्यात आले आहेत. त्यात सर्व औषधीसाठा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा, प्रशिक्षित स्टाफ ठेवण्यात आला आहे. सोबतच बंद केलेली तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यातील खाटा, औषधसाठा, ऑक्सिजनची सुविधा देऊन पुरेसा स्टाफ उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, इकरा महाविद्यालयातही रुग्णांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. 
 
लग्न, बैठकांवर करडी नजर 
विवाह समारंभ, बैठकांमध्ये केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. जास्त लोक असल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शनिवारी कारवाई आणखी कडक केली आहे. सर्वांनीच मास्क लावूनच घराबाहेर पडले पाहिजे. दुकानदार, बाजारपेठा, व्यापारी संकुलात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. 

पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाइन राहात नाहीत. त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत. होम क्वारंटाइन सिस्टिम बंद करण्याबाबत निर्णय घेण्यापर्यंत जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग पोचला आहे. मास्कचा वापर हीच लस समजावी, गर्दी जाणे टाळावे. 
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक  

संपादन ः राजेश सोनवणे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com