esakal | केंद्रीय पथकाचा जळगाव जिल्ह्यात चार दिवस मुक्काम 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशातील अन्य राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने असे ५० जिल्हे निश्‍चित करुन तेथील आढावा, उपाययोजनांच्या दृष्टीने ५० पथकांची नियुक्ती केली आहे. 

केंद्रीय पथकाचा जळगाव जिल्ह्यात चार दिवस मुक्काम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरासाठी गठीत केलेल्या तज्ज्ञ पथकांमधील एक पथक आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. पथकाने सायंकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. तर चार दिवस मुक्कामी असलेले हे पथक शुक्रवारपासून ‘फिल्ड व्हीजिट’ करणार आहे. 
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग तीव्रतने वाढत आहे. देशातील अन्य राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने असे ५० जिल्हे निश्‍चित करुन तेथील आढावा, उपाययोजनांच्या दृष्टीने ५० पथकांची नियुक्ती केली आहे. 

जळगावात पथक दाखल 
कोरोना संसर्ग तीव्र होण्यात जळगाव जिल्ह्याचाही वरचा क्रमांक आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक आज दाखल झाले. तीन सदस्यीय पथकात कुणालकुमार यांच्यासह डॉ. अनुपमा (भुवनेश्‍वर), डॉ. श्रीकांत (जोधपूर) यांचा समावेश आहे. 

बैठकीत घेतला आढावा 
दुपारी पथक जळगावी दाखल झाले. सायंकाळी या पथकातील सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी, पालिकांचे सीईओ, मनपा आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची व्हर्चुअल बैठक घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. 

आजपासून फिल्डवर 
हे पथक तीन ते पाच दिवस जिल्ह्यात तळ ठोकून असेल. बैठकीतल आढाव्यानंतर शुक्रवारपासून शहरी व ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करेल. संसर्ग वाढण्याची कारणे, जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना, आरोग्य सुविधांचा आढावा घेतल्यानंतर त्यात काही सुधारणा करायच्या, त्रुटी कोणत्या व त्या दूर कशा पद्धतीने करायच्या याबाबत हे पथक सूचना करेल.

loading image