esakal | जळगाव शहरात चिंता; आठवडाभरात वाढले चारशेवर रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. चाचण्यांची संख्या दीड- दोन हजारांच्या घरात असतानाही नव्या बाधितांचा आकडा पन्नासच्या आत राहत होता.

जळगाव शहरात चिंता; आठवडाभरात वाढले चारशेवर रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. गेल्या आठवडाभरात केवळ दोन दिवस तीसच्या आत राहिलेली रुग्णसंख्या दररोज पन्नाशीचा आकडा पार करत असून मंगळवारीही ५० रुग्ण आढळल्यानंतर या सहा-सात दिवसांत चारशेवर रुग्णांची भर पडली आहे. एकट्या जळगाव शहरात आज तब्बल ३१ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. चाचण्यांची संख्या दीड- दोन हजारांच्या घरात असतानाही नव्या बाधितांचा आकडा पन्नासच्या आत राहत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून सातत्याने पन्नासपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. डिसेंबरच्या २९ तारखेपासूनच रुग्ण बऱ्यापैकी वाढल्याचे दिसत आहे. सोमवारी ६१ रुग्ण आढळल्यानंतर आज मंगळवारीही केवळ हजारांच्या आत चाचण्यांचे अहवाल प्राप्त असताना ५० रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ८९ झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा १३३१ झाला आहे. ३२ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ५४ हजार २७६ झाली असून हे प्रमाण ९६.७७ टक्के आहे. 
 
जळगावात पुन्हा विस्फोट 
जळगाव शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक त्याबाबत कमालीचे उदासीन आहे. बाजारात, महाविद्यालयांमध्ये गर्दी दिसत असून नागरिकांच्या तोंडावर मास्कचा पत्ता नाही, असेही चित्र आहे. त्यामुळे जळगाव शहरात कोरोना संसर्गाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असताना मंगळवारी तब्बल ३१ रुग्णांची नोंद जळगावात झाली. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ७, अमळनेर ४, जळगाव ग्रामीण २ रुग्ण आढळले. सात तालुके निरंक राहिले. 

संपादन ः राजेश सोनवणे