खुर्चीवर बसण्याचे कारण..शिवीगाळ अन्‌ थेट खून 

रईस शेख
Tuesday, 26 January 2021

मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर भूतपलित गर्दीत जिल्‍हा रुग्णालयात हजर होता. डॉक्टरांनी तपासले तेव्हाही आणि नंतर मृतदेह विच्छेदनगृहात टाकल्यानंतरही तो मृतदेहरवर पंचनामा करताना, आत शिरताना हजर होता.

जळगाव : शाहूनगर जळकी मिलमधील टेंट हाउस गुदामबाहेर बसलेल्या अल्तमश शेख शकील ऊर्फ सत्या (वय २१) याच्याशी खुर्चीवर बसण्यावरून शिवीगाळ झाली. हल्लेखोर अजरुद्दीन ऊर्फ भूतपलित शेख हुस्नोदिन (भिकन) याने लोखंडी पाइपने मारहाण केल्याने तडफडतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. ‘बाप’ बोलला, आईवरून शिवीगाळ केली... म्हणून संतापात मारल्याचे संशयिताने पोलिसांना गुन्हा कबुल करताना सांगितले. 
जळकी मिलमध्ये टेंट हाउसच्या गुदामाजवळ मयत अल्तमश ऊर्फ सत्या व त्याच्या जोडीदारांची बैठक होती. रविवारी तो एकटाच मिलमध्ये गेला. टेंट हाउसबाहेर खुर्ची टाकून तो बसला असताना, मागून अजरुद्दीन ऊर्फ भूतपलित आला व त्याने खुर्ची मागितली. त्यावरून शिवीगाळ होत वाद वाढला. भूतपलितने दगड फेकून मारला तो अल्तमशच्या डाव्या कानाच्या मागे लागून डोके फुटले. नंतर भूतपलितने टेंट हाउसमधून स्टेजचा पाइप आणून छातीवर, मांड्यांवर बेदम मारहाण केल्याने अल्तमश खाली कोसळला. घटना कळताच मृताच्या काकासह कुटुंबीयांनी धाव घेत सत्याला उचलून जिल्‍हा रुग्णालयात आणले. 

संशयित मृतदेहासोबत 
मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर भूतपलित गर्दीत जिल्‍हा रुग्णालयात हजर होता. डॉक्टरांनी तपासले तेव्हाही आणि नंतर मृतदेह विच्छेदनगृहात टाकल्यानंतरही तो मृतदेहरवर पंचनामा करताना, आत शिरताना हजर होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे घटनास्थळावर आले तेव्हाही तो घटनास्थळावर आला. नंतर तो फरारी झाला. 

रंगीत केसांनी पटली ओळख 
प्रत्यक्षदर्शी कॅटरिंग कामगार भेदरून गेले होते. पोलिसांनी चौकशी केल्यावर मारहाण करणाऱ्याचे डोक्याचे केस रंगवलेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून फोटो दाखवताच त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याचे घर गाठले. त्याच्या आईने तो उस्मानिया पार्क येथे गेल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांच्या घरी जाऊन मच्छीवर ताव मारत असलेल्या भूतपलितला ताब्यात घेतले. 

संशयिताने काढून दिला पाइप 
सोमवारी (ता. २५) सकाळी गुन्हे शाखेचे फॉरेन्सिक टीमचे तज्ज्ञ, निरीक्षक धनंजय येरुळे व त्यांचे पथक संशयिताला घेऊन घटनास्थळावर आले. पुरावे संकलनासह हल्ल्यात वापरलेला लोखंडी पाइप सरकारी पंचासमक्ष झुडपातून काढून दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news late night murder case