एक गाडी दोन नंबर प्लेट; चोरीच्या उद्देशाने फिरत होते तिघे..पुढे ग्रामस्‍थांनी काय केले वाचा

crime
crime

मेहुणबारे (जळगाव) : चोरी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री संशयास्पद फिरणाऱ्या तिघा चोरट्यांना वरखेडे तांडा (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. या तिघांकडे इंडिका वाहनासह धारदार शस्रे मिळून आली असून तपासात त्यांच्याकडून दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरखेडे तांडा (ता. चाळीसगाव) येथे बंजारा समाजाची मोठी वस्ती असून रात्री अडीचच्या सुमारास वरखेडे- लोंढे रस्त्यावरील टपरी वजा दुकानाचे कुलूप तोडण्याचा आवाज जवळच घराच्या गच्चीवर झोपलेल्या ईश्‍वर राठोड या तरुणाला आला. चोरट्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच, ईश्‍वरने गावातील काही जणांना मोबाईलवरुन चोरी होत असल्याचे कळवले. त्यानुसार, तांड्यावरील काही तरुण दुकानाच्या दिशेने निघाले. मात्र, आपल्याकडे गावातील लोक येत आहेत, याचा सुगावा चोरट्यांना लागल्याने ते जवळच्या शेतात पळून गेले. काही तरुणांनी धावत जाऊन एका चोराला पकडले.

दोघांनाही बोलावले
ग्रामस्थांच्या ताब्यात आलेल्या चोरट्याला सुरवातीला ग्रामस्थांनी विश्‍वासात घेतले. त्याला तंबाखू देऊन पाणी पाजल्यानंतर त्याच्या पळून गेलेल्या दोघांना बोलवण्यास सांगितले. कुठलीही मारहाण न करण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिल्यानंतर पकडलेल्या चोरट्याने त्याच्या मोबाईलवरुन पळून गेलेल्या त्याच्या दोघा साथीदारांना फोन करुन बोलावले. दोघे चोरटे आल्यानंतर ग्रामस्थांनी तिघांना बांधून ठेवले व या घटनेची माहिती वरखेडेतील पोलीस पाटील राधेश्‍याम जगताप यांना कळवले. त्यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले यांना दिल्यानंतर काही वेळात श्री. देसले हे आपले सहकारी कमलेश राजपूत, योगेश बोडके, सिद्धांत शिसोदे, गोरख चकोर, हनुमंत वाघोरे, गफ्फार शेख, सुभाष पाटील, छोटू सोनवणे यांच्यासह तांड्यावर आले. तिघा चोरट्यांनी तांड्यावरील एका दुकानातून ६०० रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.

धारदार शस्त्र जप्त
अधिक चौकशीत तिघांकडे इंडिका गाडी (क्रमांक- एम. एच. ०४ एच. ए.- ३१८८) व त्यासोबत धारदार सुरा, करवत, छिनी, हातोडी, धारदार चाकू आदी साहित्य मिळून आले. यामुळे हे तिघे मोठी चोरी करण्याच्या उद्देशाने या भागात आल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मुश्‍ताक उर्फ भुऱ्या अय्युब सय्यद, अनिल हिरामण सोनवणे (दोन्ही रा. लळिंग) व सुनील लालचंद भिल (रा. तिखी, ता. धुळे) यांचा समावेश असून त्यांच्याविरोधात हिरामण गोपा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार सुभाष पाटील करीत आहेत.

एकाच गाडीच्या दोन नंबर प्लेट
तिघा चोरट्यांकडे असलेल्या इंडिका गाडीच्या त्याच क्रमांकाच्या दोन नंबरप्लेट मिळून आल्या. ज्यात एक पिवळ्या रंगाची ‘ऑल इंडिया परमीट’ असलेली तर दुसरी नियमित नंबर प्लेटचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या बाहेर जाऊनही या तिघांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी मुश्‍ताक उर्फ भुऱ्या अय्युब सय्यद याच्या शिरुड (धुळे) येथील ‘एटीएम’ वाहनाने ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

तांडावस्तीवरील ग्रामस्थांनी दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. अट्टल चोरट्यांना पकडून देणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. अशीच सतर्कता प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी दाखवून पोलिसांना सहकार्य करावे. बाहेरचे अनोळखी व्यक्ती गावात संशयास्पद फिरताना आढळून आल्यास पोलिसांना कळवावे.
- पवन देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com