प्रेमीयुगलाला लुटले; गप्पांमध्ये झाले उघड अन्‌ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

रईस शेख | Friday, 1 January 2021

सायंकाळी सातला शहरातील मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेला. त्या वेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येऊन एकाने दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यास सुरवात झाली.

जळगाव : मेहरूण तलावावर मैत्रिणीसह वॉकिंग करणाऱ्या तरुणावर चॉपरने हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीतील शोएब शेख ऊर्फ माकोडा शेख नरूद्दीन (वय २२, रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. गुन्हा घडल्यापासून फरारी असलेल्या या टोळीतील म्होरक्या भुसावळच्या टोळीकडे आश्रयित होता. 
इंद्रजित देशमुख (वय २५, रा. आदर्शनगर) बाहेरगावाहून आलेल्या मैत्रिणीसोबत गेल्या १६ नोव्हेंबरला सायंकाळी सातला शहरातील मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेला. त्या वेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येऊन एकाने दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यास सुरवात झाली. दुसऱ्याने तरुणीशी झटापट करून २५ हजारांचा मोबाईल हिसकावला. तर तिसऱ्या गुंडाने धारदार चॉपरने हल्ला चढवला. खिशातील मोबाईल, पैसे घेऊन तिघेही पसार झाले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी राहुल राजू गवळी (वय २०) याला गेल्या १७ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. तर, शोएब शेख ऊर्फ माकोडा शेख नरूद्दीन (२२), शेख शकील शहा रूबाब शहा असे दोघे फरारी होते. 

अशी झाली अटक 
मेहरूण परिसरात नेहमीच तरुण-तरुणी, प्रेमीयुगलांची लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या शोएब शेख ऊर्फ माकोडा हा सलग तीन - चार गुन्हे करून पसार होतो. यंदा तो, गुन्ह्यानंतर पसार झाला. मात्र, काही दिवसांनंतर भुसावळ येथील गुन्हेगारांकडे आश्रयाला आला. येथून त्याच्या चोऱ्यामाऱ्या सुरूच होत्या. दारूच्या नशेत टोळीबरेाबर पार्टी करताना बाता मारता मारता माकोड्याने स्वतःची कुंडली मांडली. तेथूनच सहाय्यक निरीक्षक आनंदसिंग पाटिल, अतुल वंजारी यांना माकेाड्याची माहिती मिळाली, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह पथकाने भुसावळ गाठून शोएब ऊर्फ माकोडा याला अटक केली. 

संपादन ः राजेश सोनवणे