श्वान प्रजनन, विक्रीच्या नोंदणी आता बंधनकारक 

देवीदास वाणी
Sunday, 3 January 2021

शहरासह जिल्ह्यात नोंदणी न करता पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांनी आपली नोंदणी करावी. तसे आदेश महापालिका, पालिका, ग्रामपंचायतींना दिले आहेत.

जळगाव : प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ आणि श्वानप्रजनन व विपणन नियम, २०१७ नुसार जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान नियम, २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांना संस्थाची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे, अन्यथा ही केंद्रे अवैध समजली जाईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिला. 
शहरासह जिल्ह्यात नोंदणी न करता पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांनी आपली नोंदणी करावी. तसे आदेश महापालिका, पालिका, ग्रामपंचायतींना दिले आहेत. नोंदणीकरिता विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांना सादर करावा. पेटशॉप नोंदणीसाठी अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे सादर झाल्यानंतर संबंधितास तीन महिन्यांसाठी तात्पुरता परवाना देण्यात येईल. जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या अहवालानंतर पाच वर्षांसाठी परवाना देण्यात येईल. 

तर होवू शकते कायदेशीर कारवाई
श्वान प्रजनन व विपणनबाबतचा नोंदणी अर्ज केल्यानंतर सोबत जिल्हास्तरीय तपासणी समितीचा अहवाल महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे सादर झाल्यानंतर संबंधिताना दोन वर्षांसाठी परवाना देण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्र नोंदणीशिवाय अवैध ठरतात. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पाळीव प्राणी दुकान आणि श्वान प्रजनन व विपणन केंद्रांनी नोंदणी करून घ्यावी. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news dog breeding and sale registration compalsary