
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्याबाबत आपले मत मांडण्यासाठी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात खडसे यांनी सांगितले, की भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी यापुर्वी चार वेळेस ईडीची नोटीस मिळाली आहे
जळगाव : भोसरी येथील भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने नोटीस पाठविली असून या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. ईडी ज्या ठिकाणी आणि जेव्हा बोलवेल तेथे पुर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्याबाबत आपले मत मांडण्यासाठी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात खडसे यांनी सांगितले, की भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी यापुर्वी चार वेळेस ईडीची नोटीस मिळाली आहे. आता मिळालेली नोटी ही पाचवी असून, त्यास पुर्णपणे सहकार्य करणार असून ३० डिसेंबरला उपस्थित राहण्याचे नोटीसीत म्हटले आहे. यापुर्वी देखील आयटीबाबत झालेल्या चौकशीला पुर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहून सहकार्य केले. त्याचप्रमाणे ईडीला देखील सहकार्य राहणार असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले.
द्वेषापोटी नाथाभाऊंवर आरोप : जिल्हाध्यक्ष पाटील
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दोन महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच नाथाभाऊंनी म्हटले होते की ईडीची नोटीस येणार; पण त्यास सक्षमपणे उत्तर देणार. आता ईडीची नोटीस आली असली त्यास नाथाभाऊ सक्षमपणे उत्तर देतीलच; पण जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटीत झाल्याचे पाहून द्वेषापोटी हा प्रकार झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी सांगितले.