
सिमा सुरक्षा दलातील जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत राहुल पाटील यांची पाच वर्ष वयाची अमृता आणि दोन वर्षाची काव्या यांनी पित्याच्या पार्थिवास अग्निडाग दिला.
एरंडोल (जळगाव) : उत्राण (ता. एरंडोल) येथील मुळ रहिवासी तथा शहरातील गांधीपुरा भागातील शंकरनगरमधील रहिवासी आणि सध्या पंजाब प्रांतातील फजलखा येथे कार्यरत सिमा सुरक्षा दलातील जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत राहुल पाटील यांची पाच वर्ष वयाची अमृता आणि दोन वर्षाची काव्या यांनी पित्याच्या पार्थिवास अग्निडाग दिला. चिमुकल्या दोन मुली वडिलांच्या पार्थिवास अग्निडाग देत असताना उपस्थित हजारो नागरिक अक्षरशः भावनाविवश झाले होते. यावेळी युवकांनी दिलेल्या भारत माता कि जय, वंदे मातरम, वीर जवान राहुल पाटील अमर रहे.. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पार्थीवावर पुष्पवृष्टी
सिमा सुरक्षा दलाचे जवान राहुल पाटील यांचे शुक्रवारी (ता.5) पंजाबमध्ये कार्यरत असतांना निधन झाले. त्यांचा मृतदेह शनिवारी (ता.६) मध्यरात्री शहरात आणण्यात आला. सकाळी दहा वाजता धरणगाव चौफुली येथून त्यांच्या निवासस्थानापर्यंत सजवलेल्या वाहनातून पार्थिव नेण्यात आले. निवासस्थानापासून रामलीला मैदानावरील स्मशानभूमीपर्यंत सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्यावर ठिकठीकाणी त्यांच्या मृतदेहावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
निरागस मुली गर्दीकडे पाहत होत्या
जवान राहुल पाटील यांचे पार्थीव पाहताच पत्नी ज्योती पाटील यांची शुद्ध हरपली होती. तर दोन्ही लहान निरागस मुलींना काहीच भान नव्हते. घराबाहेर आणि गावात जमलेल्या गर्दीकडे दोन्ही मुली फक्त पाहत होत्या. या निरागस मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून उपस्थितांची मने मात्र हेलावुन गेली होती.
पित्याप्रमाणे त्यांचे पितृछत्र हरपले
जवान राहुल पाटील यांचे पितृछत्र बालपणीच हरपले होते. त्यांच्या आईने मोलमजुरी करून दोन्ही मुलांना वाढवले. पित्याप्रमाणेच त्या दोन्ही चिमुकल्या मुलींचे पितृछत्र हरपले. मार्च महिन्यात परिवारासह घरी येणार असल्याचे त्यांनी 4 फेब्रुवारी रोजी व्हीडीओकॉल वरून आईला सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला.
मानवंदना देत अंत्यसंस्कार
रस्त्याच्या दुतर्फा तसेच इमारतींवर हजारो नागरिक आणि महिलांनी गर्दी केली होती. रामलीला मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाच व दोन वर्षाच्या मुलींनी त्यांच्या पार्थिवास अग्निडाग दिला. यावेळी त्याना मानवंदना देण्यात आली. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, मुख्याधिकारी किरण देशमुख, सिमा सुरक्षा दलाचे निरीक्षक शिवप्रताप सिंग, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी महाजन यांनी राहुल पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राहुल पाटील यांच्या परिवाराची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. चाळीसगाव येथील खानदेश रक्षक ग्रुपच्या सदस्यांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे शनिवारी (ता.6) रात्री अकरा वाजेपर्यंत अंत्यसंस्कारस्थळी थांबून होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी एक क्विंटल रांगोळी आणि एक क्विंटल झेंडूचे फुले उपलब्ध करून दिले.
संपादन ः राजेश सोनवणे