हृदयद्रावक..आई व दहा वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू; ट्रकच्या चाकाखाली अपघात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

अपघाताचे दृश्‍य पाहून अनेकांच्या अंगात थरकाप उडाला. शाळेतून घरी जाताना आई व मुलाचा मृत्‍यू झाल्‍याने अगदी क्षणात होत्‍याचे नव्हते झाले.

एरंडोल (जळगाव) : शाळेत नेहमी मुलाला सोबत घेवून जाणारी शिक्षीका असलेली आई आणि दहा वर्षीय चिमुकल्‍याला नियतीने एकाच वेळी परिवारापासून दूर केले. शहरापासून जवळच झालेल्या अपघातात आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. 

एरंडोल येथील विद्यानगर येथे राहणारे तथा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असलेल्‍या कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) या मुलगा लावण्य चौधरी (वय १०) याला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) रोज शाळेत घेवून जात असतात. नेहमीप्रमाणे आज देखील त्‍या मुलास शाळेतून घरी जात असताना नियतीने डाव साधला. 

प्रत्‍यक्षदर्शीचा थरकाप
सकाळी दहाच्या सुमारास कविता चौधरी या मुलाला घेवून जात असतांना ट्रक (जीजे २६ टी ८२६४) ने धडक दिली. या धडकेत आई व मुलगा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताचे दृश्‍य पाहून अनेकांच्या अंगात थरकाप उडाला. शाळेतून घरी जाताना आई व मुलाचा मृत्‍यू झाल्‍याने अगदी क्षणात होत्‍याचे नव्हते झाले. अपघाताची माहिती कळताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरीकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news ernadol accident mother and boy death