
खानदेश म्हटला म्हणजे अगदी वेगळेपण आठवतेच. प्रामुख्या खाण्याच्या बाबतीत खानदेश त्यातच जळगावचे एक वेगळे वैशिष्ट्य. मग ते बनविलेल्या खाद्यपदार्थ म्हटले तरी बरोबरच. पण इथे बनविलेल्या नव्हे; तर निसर्गाने दिलेल्या अवीट गोडवी असलेल्या एका खास वस्तूची. जे फक्त जळगावातच मिळणार.
जळगाव : बोरांचे अनेक प्रकार पाहण्यास मिळतात. त्यातच आंबट, तुरट चव असलेले गावरान बोर प्रत्येकालाच हवेहवे वाटतात. पण अवीट गोडी व आरोग्यवर्धक असलेल्या बोरांना देखील हंगामात नेहमीच मागणी असते. अशी कलम केलेली बोर बाजारातच मिळतील. पण अवीट गोडी असलेले बोरं म्हटले म्हणजे मेहरूणचीच आणि ती देखील जळगावमधली.
अनेक शेतकरी बांधावरची शेती म्हणून बोरांचे उत्पादन घेतात. शेताच्या बांधावर असलेल्या बोरी कलम करून त्याचे उत्पादन घेतले जाते. पण वाहतूक व वेचणीच्या मजुरी खर्चा व्यतिरिक्त कुठलाही खर्च याला लागत नसल्याने एक चांगले उत्पादन मानले जाते. त्यातल्या त्यात मेहरूणी बोरांकडे तसे पाहीले जाते. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठी या बोरांची बांधावरची शेती अधिक दिसून येते.
मेहरूणी बोरांची चवच न्यारी
मेहरूणी बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची आहेत. जळगाव शहरानजीकच्या मेहरूण शिवारात या बोरांची शेती पूर्वी केली जात होती. मेहरूणच्या बोरांची चव चाखण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. अर्थात याची बाहेर देखील निर्यात हेात असते. त्या अनुषंगाने जळगाव बाजार समितीमध्ये मेहरूणी बोरांची तुलनेत सर्वाधिक आवक होते. बाजार समितीमधील दोन अडतदारांकडे अधिक आवक होते. कारण शेतकऱ्यांकडे तशी आगाऊ नोंदणी केलेली असते.
प्रतिकिलो २० ते २५ रूपये दर
दिवाळी सण आटोपला, की बोरांची आवक सुरू होते. मागील २० ते २५ दिवस प्रतिदिन सरासरी बारा क्विंटल आवक झाली. किमान २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मेहरूणी बोरांना यंदा मिळाला. मागील वर्षीदेखील डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक टिकून होती. काही शेतकरी जळगाव शहरात बोरांची हातविक्री करतात. त्यांना प्रतिकिलो 30 ते 40 रुपये दर सध्या मिळत आहेत.
पुणे, मुंबई अन् बेंगळुरूपर्यंत पोहचली गोडी
संकरित किंवा मोठ्या आकाराच्या बोरांच्या तुलनेत मेहरूणी बोरांचे ग्राहक जळगाव, धुळे भागात अधिक आहेत. काही जळगावकर मंडळी आपल्या नातेवाइकांना पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई, बेंगळुरू, नागपूर आदी भागात पाठविण्यासाठी ही बोरे आवर्जून घेतात. यामुळे या बोरांना बाजार समिती किंवा किरकोळ बाजारात चांगला उठाव आहेत. जानेवारीच्या मध्यानंतर या बोरांची आवक कमी होवू लागली आहे.
किरकोळ, कोरडवाहू, आश्वासक पीक
बांधावर बोरांचे उत्पादन घेतले जात असते. त्यांना सिंचनाची गरज नाही. खते, फवारण्या कुठल्याही करीत नाही. चार ते 10 वर्षे वयाची ही झाडे असून, दोन दिवसाआड साधारण 50 किलोपर्यंत बोरं मिळतात. या बोरांना वर्षभर कुठलाही खर्च नाही. बोरांच्या झाडांची छाटणी मे किंवा जून महिन्यात करून त्यांना जोमात फुटवे येतात. या फुटव्यांनाही चांगला बहार येतो. वेचणी आम्ही स्वतः करून घेतो. मजुरी लागत नाही. एका झाडापासून मला एका हंगामात किमान तीन ते चार हजार रुपये सहज मिळतात.