आस्मानीनंतर शेतकऱ्यांवर सुलतानी संकट; वीजपुरवठा खंडितने हवालदिल

farmer loss
farmer loss

भडगाव (जळगाव) : एकीकडे आस्मानी संकटाने तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे वीज कंपनीच्या पर्यायाने सरकारच्या वीज तोडणीच्या सुलतानी धोरणामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. अंतिम टप्प्यात आलेले पीक कसे वाचवायचे अन् ऐन उन्हाळ्यात गुरांना पाणी कसे पाजायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 
सध्या वीज कंपनीने कृषीपंपाच्या वीज तोडणीची मोहीम हाती घेतली आहे. दररोज जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, व्यथा जाणून घ्यायला कुणीही तयार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. 

शेतकरी नैराश्‍याच्या गर्तेत 
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने वादळ अन् गारपिटीने शेतकऱ्यांच्या भरलेल्या शेताची स्मशानभूमी केली. यंदा चांगले उत्पादन निघाल्याने इमले रचणारा शेतकरी सायंकाळी भुईसपाट झालेले पीक पाहून पूर्णपणे कोसळला आहे. रब्बी हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास अक्षरश: हिरावून गेला आहे. या संकटातून सावरत नाही तोच वीज कंपनीच्या म्हणजेच शासनाने थकबाकीदार कृषीपंपाची तोडणीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखे झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. 

वीजबील कसे भरायचे? 
आस्मानी संकटामुळे अंतिम टप्प्यात आलेला हंगाम मातीत गेला आहे. त्यामुळे त्यातून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यात काही पिके शेतात आहेत. त्यातून उत्पन्न येण्याची शक्यता आहे. पण कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेवटचे आवर्तन कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पीक हातातून गेले तर वीजबील कसे भरायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने शिवारात जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. 

शेतकऱ्यांना मुदत देणे आवश्यक 
रब्बी हंगाम अजून संपायचा आहे. त्यामुळे वीज कंपनीने शेतकऱ्यांना सूचना देऊन वीजबील भरण्याबाबत मुदत देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची नड पाहून वीजपुरवठा खंडित करणे तुघलकीपणाचे आहे. हंगामातून पैसे आले तरच शेतकऱ्यांना वीजबील भरणे शक्य आहे. हंगामच मातीत गेला तर वीजबील भरण्यासाठी पैसा शेतकरी पैसा कुठून आणतील, ही बाजू ही समजून घेणे गरजेचे आहे. 

भाऊ, शेतकऱ्यांचे वाली व्हा! 
बळीराजा अडचणीत असताना आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांचे तारणहार व्हावे, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांनी यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. किमान ज्या भागात वादळ, गारपीट झाली तेथे ही तोडणीची मोहीम थांबवून त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा आहे.

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com