राऊतांच्या त्‍या वक्तव्यांच्या चर्चेत सरकार दिवस काढतंय : गिरीश महाजन

कैलास शिंदे
Saturday, 2 January 2021

राऊत यांनी विरोधकांवर काही तरी लिहायचे, कमरेखालचे वक्तव्य करायचे आणि त्यावरच दिवसभर चर्चा घडवून आणावयाची एवढेच काम आपल्याला वर्षभरात दिसून आले आहे. 

जळगाव : खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या व केलेल्या कमरेखालच्या घाणेरड्या वक्तव्यावर दिवसभर चर्चा करणे एवढेच काम सध्या राज्यातील सरकारचे सुरू आहे. गेल्या वर्षभरात जनतेच्या विकासाचे सांगण्यासारखे एकही काम ठाकरे सरकारकडे नाही, असा सणसणीत टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना लगावला. 
नवीन वर्षाच्या जनतेला शुभेच्छा देत नवीन वर्ष ‘कोरोना’मुक्त जावो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील सरकारबाबत बोलताना ते म्हणाले, की वर्षभरात सरकारने जनतेचे एकही काम केलेले नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घाणेरड्या वक्तव्यावर हे सरकार आपले दिवस काढत आहे. राऊत यांनी विरोधकांवर काही तरी लिहायचे, कमरेखालचे वक्तव्य करायचे आणि त्यावरच दिवसभर चर्चा घडवून आणावयाची एवढेच काम आपल्याला वर्षभरात दिसून आले आहे. 

सरकार कोण चालवंतय? 
राज्यात सरकार कोण चालवतंय हेच कळत नाही, असा आरोप करून महाजन म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत सरकार पूर्णपणे उदासीन आहे. कापूस खरेदी केवळ दहा टक्केच सुरू आहे. दिवसाला १५० गाड्या खरेदी करण्यात येत होत्या, त्यात आता केवळ पंधराच गाड्या कापूस खरेदी सुरू आहे. मका खरेदीची हीच परिस्थिती आहे. आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस व मका पडून आहे. परंतु हे शासन खरेदी करण्यास तयार नाही. 

सिंचन प्रकल्प ठप्प 
सिंचनाच्या कामासाठी या सरकारने कोणताही निधी उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे राज्यातील सिंचन प्रकल्पांची सर्व कामे बंद पडली आहेत. या सरकारने मक्तेदारांचेही पैसे न दिल्यामुळे राज्यात अनेक कामेही बंद आहेत. या समस्यांबाबत कोणाशी बोलावे तेच कळत नाही. कारण राज्यात सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत की कोण चालवत आहेत, हेच कळेनासे झाले आहे. 
 
‘बारसं’ करणारे सरकार 
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नवीन कोणतेही प्रकल्प राज्यात आणलेले नाहीत. मात्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या प्रकल्पांना नावे देण्यासाठी मात्र ते तत्पर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे ‘बारसं’करणारे सरकार आहे. आमच्या सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग करण्यात आला, सिंचनाच्या चांगल्या योजना राबविण्यात आल्या. ग्रामीण भागातील शेतरस्त्याची कामे करण्यात आली. मात्र आजही राज्यात सर्व कामे ठप्प आहेत. हे सरकार केवळ एकेक दिवस काढतंय बस्स..! 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news girish mahajan sanjay raut mahavikas aaghadi political news