तहसिल कार्यालयांवर मतदान यंत्रे

देवीदास वाणी
Friday, 8 January 2021

निवडणूकीस आता केवळ आठ दिवस शिल्लक उरल्याने उमेदवारांकडून प्रचारास आता वेग आला आहे. उमेदवार आपापल्या परीने हस्तपत्रके छापून आपण आगामी काळात काय कार्य करणार आहेत

जळगाव : जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित तहसिल कार्यालयात आज अखेर २६५६ मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहे. तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निहाय उमेदवारांच्या यादया लावून यंत्रे सील करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 
जिल्‍ह्‍यात एकूण २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अज अवैध ठरले होते. तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता ७ हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. 

आठ दिवसांवर मतदान
निवडणूकीस आता केवळ आठ दिवस शिल्लक उरल्याने उमेदवारांकडून प्रचारास आता वेग आला आहे. उमेदवार आपापल्या परीने हस्तपत्रके छापून आपण आगामी काळात काय कार्य करणार आहेत याची माहिती मतदारांना देत आहे. प्रभाग लहान असल्याने काही उमेदवारांच्या दोनवेळा प्रचार फेऱ्याही झाल्या आहेत. 
 
तहसिल कार्यालयात मतपत्रीका होणार सील 
सर्वच तहसिल कार्यालयांना मतदान यंत्रे पाठविण्याची कार्यवाही आज पूर्ण केली आहे. तहसिल कार्यालयात गाव व मतदान केंद्र निहाय मतदान यंत्रे तयार केली जात आहे. यात उमेदवारांच्या नावाची यादी निवडणूक चिन्हासह मतदान यंत्रावर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रात्येक्षिके दाखविली जाणार आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election evm machine seal in tahsil office