खासदारांचे दत्तक हातेड गाव; जिथे रंगतेय प्रतिष्ठेची लढाई 

gram panchayat election
gram panchayat election

चोपडा (जळगाव) : तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या हातेड बुद्रुक या गावात माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल तर खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांचे जनविकास पॅनल या दोघांमध्ये ४ प्रभागात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये आमनेसामने सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. 
चोपडा तालुक्याचे राजकारण हातेड बुद्रुक गावाच्या राजकारणावर अवलंबून असते म्हणून हातेड गावास तालुक्याची राजधानी म्हणून गणले जाते. याच खासदार रक्षा खडसे आदर्श दत्तक गावात निवडणूक चुरशीची होणार आहे. एका बाजूला माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणेंसह काही प्रतिष्ठित तर दुसऱ्या बाजूला खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच भाजप कार्यकर्ते मनोज सनेर यांच्यात सरळ लढत होत आहे. 

निवडणुकीत समीकरण बदलली
गाव आदर्श असल्याने या गावास खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतले होते. खासदार खडसे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावासाठी एक कोटी ७२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना, तसेच डीपीडीसीमधून ५५ लाखांची मराठी शाळेची इमारत मंजूर केली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस या गावातील राजकीय समीकरणेही बदलत गेली आहेत. एकमेकात असलेले मतभेद विसरून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे एकत्र होऊन निवडणूक लढवीत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांची सून वर्षा चेतन सोनवणे आणि भाजपचे पदाधिकारी व माजी सरपंच मनोज सनेर यांच्यामध्ये काट्याची लढत आहे. मात्र, गेल्या दोन पंचवार्षिकपासून म्हणजे २०१० मध्ये व २०१५ या दोन पंचवार्षिकमध्ये मनोज सनेर हे निवडून आले आहेत. 

बाजी मारण्याची प्रतिष्‍ठा
दोन्ही गटांनी बाजी मारण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांच्या बाजूने जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे पदाधिकारी तर मनोज सनेर (विकी डॉक्टर) यांच्या बाजूने हातेड आश्रम शाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच संदीप सोनवणे, प्रा. चंद्रकांत सनेर, माजी विकासो चेअरमन सतीश सोनवणे यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांची फळी असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदारांची सूनेसह ग्रामविकास पॅनल समोर जनविकास पॅनल या निवडणुकीत रणांगणात असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

आदर्श, दत्तक गाव बिनविरोध का नाही? 
खासदार रक्षा खडसे यांनी हातेड बुद्रुक हे आदर्श असल्याने दत्तक गाव म्हणून निवड केली. या गावास कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र, या आदर्श गावाची ग्रामपंचायत निवडणूक काही बिनविरोध झाली नाही. माजी शिक्षक आमदारांचे गावात एकही जागा बिनविरोध झाली नसल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. या दोघांमध्ये कोण सरस ठरणार हे येणारा काळच ठरविणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com