निवडणुक एकाच दिवसाची; तुम्‍हालाच गावात रहायचे म्‍हणून गालबोट नको

दीपक कच्छवा
Tuesday, 12 January 2021

निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यादृष्टीने गावागावात सलोखा राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात क्षुल्लक कारणांवरूनही वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत होते.

मेहुणबारे (जळगाव) : येथील पोलिस ठाण्यातंर्गत ३० ग्रामपंचायतींची सध्या निवडणूक होत आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला असलेले महत्त्व लक्षात घेता, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यादृष्टीने येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले यांनी निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये ग्रामस्थांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणे सुरु केले आहे. निवडणुकीला गालबोट लागणार नाही, याची काळजी गावागावातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घेऊन निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात, असे आवाहनही श्री. देसले यांनी केले आहे.
मेहुणबारे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये निवडणुकीसंदर्भात संवेदनशील वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याने पोलीस ठाण्यावर ताण आला आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून श्री. देसले यांच्यासह उपनिरीक्षक हेमंत शिंदे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून आहेत. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यादृष्टीने गावागावात सलोखा राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात क्षुल्लक कारणांवरूनही वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत होते. ही स्थिती उदभवू नये म्हणून ज्या गावांमध्ये निवडणूका होत आहेत, या निवडणुका निकोप आणि शांततेच्या वातावरणात व्हाव्यात म्हणून श्री. देसले व त्यांचे सहकारी गावकऱ्यांच्या बैठका घेऊन ग्रामस्थांना आवाहन करीत आहेत. निवडणूक एक दिवसाची असते, गावकऱ्यांना मात्र गावात कायम राहायचे असते. त्यामुळे निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या जाव्यात असे श्री. यांनी देसले यांनी सांगितले.

कारवायांचा धडाका
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मेहूणबारे पोलीस ठाण्यातर्फे गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांदरम्यान शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या २८ जणांवरही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जामदा गावात ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान प्रचाराचे नारळ वाढवितांना धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याची घटना नुकतीच घडली होती.त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच श्री देसले व सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन गावात शांतता प्रस्थापित केली व शांततेला बाधा आणणाऱ्या १८ जणांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली.

निवडणूक काळात कोणीही कायदा हातात घेऊ नये. आचारसहितेचे पालन करून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी,या काळात कुणीही चुकीचे पध्दतीने वर्तन करीत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवावी.आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.

- पवन देसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक मेहुणबारे

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election police action mode no danga