पाण्याचा करावा लागणार काटकसरीने वापर..चांगला पाऊस तरीही हतनूरमध्ये पाणीसाठी कमी

hatnur dam
hatnur dam

रावेर (जळगाव) : जिल्ह्यातील तब्बल शंभर गावांना आणि शहरांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेने सुमारे १६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळा आणि ऊन वाढत चालल्याने पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत असून हतनूर आणि तापी पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र या परिस्थितीतही पाणीटंचाई जाणवणार नाही असा दावा हतनूर प्रकल्पाच्यावतीने करण्यात आला आहे.
हतनूर प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. जळगाव येथील एमआयडीसी, भुसावळ येथील रेल्वे, भुसावळ येथील आयुध निर्माणी, दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्र, वरणगाव येथील आयुध निर्माणी तसेच रावेर, सावदा, वरणगावसह परिसरातील लहान मोठ्या शंभर गावांना या प्रकल्पातून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. 

काटकसरीने करावा लागणार वापर
पाणीसाठा परिसरातील सर्वच गावांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ जूनपर्यंत काटकसरीने पुरवावे लागणार आहे. असंख्य ठिकाणी सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे तो तीन अथवा चार दिवसांआड करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोठ्या प्रमाणावर गाळ
गेल्या दहा- पंधरा वर्षांपासून या प्रकल्पात वाहून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील गाळामुळे पाणीसाठा कमी तर गाळाचा साठा अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षापेक्षा कमी पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक आहे. आज (ता. ९) सकाळी आठ वाजता प्रकल्पातील पाणीसाठ्याची परिस्थिती पुढीलप्रमाणे होती.

- पाणी पातळी-- २१०.९८५ मीटर 
- पाणीसाठा --२३४.२५ दशलक्ष घनमीटर
- जिवंत पाणीसाठा- १०१.२५ दशलक्ष घनमीटर
- पाणीसाठा- ३९.७१ टक्के
- मागील वर्षीचा ९ एप्रिल २०२० चा पाणीसाठा ५६.१८ टक्के.

प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेने कमी पाणीसाठा असला तरी काटकसरीने पाणी वापरण्याचे नियोजन असून कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, प्रकल्पाचे पाणी १५ जून पर्यंत पुरविण्यात येईल 
- आर. एस. पांडव, उपविभागीय अभियंता, हतनूर प्रकल्प.

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com