home robbery
home robbery

अवघ्‍या काही दिवसांवर मुलीचे लग्‍न; संपुर्ण कुटूंब दुसऱ्या लग्‍नात, फोन वाजला अन्‌..

जळगाव : शहरातील कानळदा रोडवरील राधाकृष्णनगर येथील जिनेंद्र सैतवाल यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरला आहे. जिनेंद्र सैतवाल यांच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करून संपूर्ण कुटुंबीय जामनेर येथे भाचीच्या लग्नाला गेले असताना चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारला. 
शिवाजीनगर कानळदा रोडवरील राधाकृष्णनगरात जिनेंद्र सैतवाल (वय ४७) हे पत्नी कविता, मुलगी साक्षी, आर्या यांच्यासह वास्तव्यास आहेत. ७ मार्चला सैतवाल यांची मोठी मुलगी साक्षी हिचे लग्न असल्याने तयारी सुरू आहे. सैतवाल दांपत्याने आहेरचे कपडे, काही दागिने नुकतेच खरेदी केले आहेत. 

भाचीच्या लग्‍नासाठी कुटूंब जामनेर
जिनेंद्र सैतवाल यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न १५ फेब्रुवारीला जामनेर येथे असल्याने संपूर्ण कुटुंबीय घर बंद करून लग्नासाठी शनिवारपासून (ता. १३) गेले होते. परंतु आज (ता. १४) सकाळी सैतवाल यांचे शेजारी वैशाली पाटील यांनी फोनकरून दार उघडे दिसत असल्याची माहिती त्यांना दिली. सैतवाल यांनी तसेच जामनेर येथून घराकडे धाव घेतली. घरी आल्यावर मुख्य ग्रिलच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आतील लाकडी दाराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला असल्‍याचे दिसले. 

घरात पाहिले तर 
सैतवाल यांनी घरात प्रवेश करून पाहिले असताना सर्व अस्‍ताव्यस्‍त असल्‍याचे पाहण्यास मिळाले. स्वयंपाकघरातील धान्याचे डबे अस्ताव्यस्त खाली पडलेले होते. आत कपाटातील साहित्य खाली फेकून लॉकरमधील २० हजार रुपये रेख, सोने-चांदीचे दागिने, लग्नाच्या आहेरच्या साड्या चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आल्यावरून जिनेंद्र सैतवाल यांनी पोलिसांना कळविले. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घरातील साहित्यावरून ठसे मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सैतवाल यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. 

...असा ऐवज लंपास 
- २० हजार रुपये 
- ९३ हजारांचे दागिने 
- दहा ग्रॅमचे मंगळसूत्र 
- दहा ग्रॅमच्या प्रत्येकी चार अंगठ्या 
- पाच ग्रॅम वजनाची अंगठी 
- एक ग्रॅम गळ्यातील गहू मणी 
- २१५ ग्रॅम चांदीचे दागिने जोडवे, बिचवे, पायल 
- ३७ हजारांचे कपडे, नवरीचा घागरा, चार साड्या, २० आहेरच्या साड्या 
असा एकूण एक लाख ५८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com