जिल्हा बॅंक, ग.स., दुध संघाच्या निवडणूकीचा बिगुल एप्रिल ते जूनमध्ये 

jdcc bank
jdcc bank

जळगाव : जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी संपली असली तरी सरपंच पदाची रणधुमाळी बाकी आहे. असे असताना मुदत संपुष्टात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक घेण्यास शासनाने परवानगी दिल्याने सहकार क्षेत्रासह नगरपालिका क्षेत्रातील रणधुमाळी सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात भडगाव, वरणगाव या दोन नगरपरीषदांचा निवडणूका होणार आहे. 

भडगाव नगरपरीषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च २०२० मध्ये, तर वरणगाव नगरपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा महिन्यापूर्वीच संपुष्टात आला होता. त्यानुसार नगरपरीषद सार्वत्रिक निवडणूक अनुक्रमे फेब्रुवारी २०२० मधे होणार होती. परंतु कोरोना प्रादूर्भावामुळे या निवडणूका प्रथमतः तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येवून प्रशासक नेमणूक करण्यात आले होते. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात येवून डिसेंबर २०२० पर्यंत या निवडणूका स्थगीत करण्यात आल्या होत्या. 

मार्चपर्यंत ढकलल्‍या निवडणुका
राज्य शासनाने १६ जानेवारीस सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा तीन महिन्यांसाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याचा निर्णय जाहिर केला होता. काल १६ जानेवारीचा आदेश रद्द करण्यात येवून नव्याने ज्या टप्प्यावर संस्थांच्या निवडणूका स्थगीत करण्यात आल्या आहेत. त्या टप्प्यापासून निवडणूका घेण्याचे निर्देश पारीत करण्यात आले आहेत. 

१ मार्चला अंतीम मतदार यादी व केंद्र प्रसिद्धी 
त्यानुसार जिल्ह्यातील दोन नगरपरीषदांसाठी १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीसह २२ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. तर १ मार्च २०२१ रोजी अंतीम मतदार यादीसह मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

सहकार क्षेत्रात रणधुमाळी 
जिल्हयात सहकार क्षेत्रातील अ, ब, क, ड अशा वर्गवारीनुसार १११८ विविध संस्था आहेत. यात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे निवडणूक स्थगीत करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात ब गटातील- १४, क-४३, ड-२६ अशा ८३ संस्था आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ पर्यत प्रलंबीत असलेल्या अ गटात १, ब-१५, क-१२५ तर ड- ६३ अशा एकूण २०४, तिसऱ्याया टप्प्यात १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानच्या ब गटातील ३२०, क-२०५, ड-८४ एकूण ६०९. चौथ्या टप्प्यात १ एप्रिल ते ३० जून २०२० दरम्यान अ गटात ४, ब-३७, क-३१, ड-८ अशा ८० तर पाचव्या टप्प्यावर १ जुलै ते ३० सप्टेबर २०२० अ गटात १, ब-५६, क-२७, ड-६ एकूण ९० आणि १ आक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यानच्या सहाव्या टप्प्यातील ब गटात ७, क- २८, ड- १७ अशा ५२ संस्थांचा निवडणूका टप्प्यानुसार व शासन निर्देशानुसार घेण्यात येणार आहेत. यात १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाल समाप्त झाला असला तरी यात समावेश करण्यात आलेला नसल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले. 

जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक ३० जूनपूर्वी 
जिल्हा मध्यवर्ती बँक, ग. स.सोसायटी, मराठा विद्याप्रसारक संस्था, जिल्हा दूध संघ आदी संस्थांच्या निवडणूका चौथ्या टप्प्यात म्हणजेच १ एप्रिल ते ३० जून दरम्यानच्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com