मध्यरात्रीनंतर आजीला आली जाग; नातू जागेवर नाही म्‍हणून शोधाशोध, गुरांच्या शेडमध्ये पाहिले तर सारे हादरले

आल्‍हाद जोशी
Wednesday, 20 January 2021

सकाळी गावात भाजीपाला विक्री करुन नंतर गुराढोरांचे शेणपुजा वारल्यानंतर गणेश संध्याकाळी दारु पिऊन गावातील चौकात आरडाओरड करत होता. त्यास त्याच्या आजीने समजावून समाजाच्या लोकांच्या सहाय्याने घरी आणले.

कासोदा (जळगाव) : येथून जवळच असलेल्या बाम्हणे येथील गणेश रामकृष्ण माळी (वय 26) या युवकाने गुरेढोरे बांधण्याच्या खळ्यात असलेल्या पत्री शेडच्या लोखंडी एँगलला बारीक दोरीच्या सहाय्याने गळफास घेतली.
बाम्हणे आजी बाबांसह गणेश माळी राहत होता. गणेशने सोमवारी (ता.18) सकाळी गावात भाजीपाला विक्री करुन नंतर गुराढोरांचे शेणपुजा वारल्यानंतर गणेश संध्याकाळी दारु पिऊन गावातील चौकात आरडाओरड करत होता. त्यास त्याच्या आजीने समजावून समाजाच्या लोकांच्या सहाय्याने घरी आणले. तेव्हापासून गणेश घरीच झोपलेला होता. 

आजीला जाग आली म्‍हणून
मंगळवारी (ता.19) रात्री दोन वाजेच्या सुमारास गणेशची आजी गंगूबाई शंकर माळी यांना जाग आली असता गणेश झोपलेल्या ठिकाणी आढळून आला नाही. यामुळे गंगूबाई यांनी मुलगा गुलाब यास उठवून गणेश जागेवर नसल्याचे सांगितले. तेव्हा गुलाब माळी यांनी त्‍यास गुरांच्या खळ्यात पहावयास गेले असता त्यांना गणेश हा खळ्यातील पत्री शेडमध्ये लोखंडी एँगलला गळफास घेतल्‍याच्या अवस्थेत आढळून आला. गुलाब माळी यांनी चुलत भाऊ अरुण हरी माळी, भिका नारायण माळी व निंबा देवराम माळी तसेच पोलीस पाटील तुकाराम मोरे यांनी गणेशला खाली उतरवून कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथे गणेशला मृत घोषित करण्यात आले. याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास हडप हे करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news kasoda village boy suicide