esakal | घोषणा होवून उलटली दोन वर्ष..शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदतीची प्रतीक्षाच 
sakal

बोलून बातमी शोधा

mahavikas aaghadi, mahatma phule karjmukti yojana

जिल्ह्यात दोन हंगामांत अतिपावसामुळे, तसेच बेमोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकांवर लावलेला खर्चसुद्धा निघाला नाही.

घोषणा होवून उलटली दोन वर्ष..शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदतीची प्रतीक्षाच 

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : महाविकास आघाडीच्या शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तसेच नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत म्हणून ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली नाही. 
जिल्ह्यात दोन हंगामांत अतिपावसामुळे, तसेच बेमोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकांवर लावलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. शासनाकडून घोषित केलेली प्रोत्साहनपर मदत, तसेच ११ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय
जिल्ह्यात सतत अवर्षण, बेमोसमी पाऊस, गारपीट, दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी पीककर्ज थकबाकीदार झाले होते. या शेतकऱ्यांना तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या काळात २०१७-१८ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपये मर्यादेंतर्गत कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील प्रोत्साहन अनुदान देण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी शासनाकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमुक्ती व प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु या शासनाकडून केवळ दोन लाख रुपये कर्जमाफी देण्यात आली असून, प्रोत्साहनपर योजना अजूनही प्रलंबित आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. 

केवळ घोषणाच
महाविकास आघाडी शासनातर्फे २०१९ च्या ऑक्टोबरअखेरपर्यंत मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडी शासनाकडून ११ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधींतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एक हजार १९४ कोटी, चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. परंतु २०१९ च्या दिवाळीपूर्वीच जिल्ह्यासाठी केवळ ३६ कोटींचा निधीस अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मंजुरी देण्यात येऊन दोन टप्प्यांत वितरित करण्यात आला होता. यातदेखील केवळ मोजक्याच लोकांना या मदतीचा लाभ देण्यात आल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत जाहीर केलेल्या प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना --- महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 
सप्टेंबर २०१८ ------- जानेवारी २०२० 
लाभार्थी २,४२,५४१--- १,५६,४५८ 
रक्कम कोटी ९६२.९५----- ८९३.२१ 

प्रोत्साहन लाभ 
लाभार्थी १,०१,०१० 

संपादन - राजेश सोनवणे

loading image