‘गिरणे’वर समांतर पुलाचे काम लवकरच : गुलाबराव पाटील

gulabrao patil
gulabrao patil

जळगाव : खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेलाही होणार असून, या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले, तर गिरणेवरील नवीन पुलाचे कामसुद्धा लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारापर्यंत नूतनीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. ६) सकाळी बांभोरी प्र. चा. आणि खोटेनगर स्टॉप येथे झाले. महापौर भारती सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, मनपा गटनेते सुनील महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनोज चौधरी, प्रशांत नाईक, अमर जैन, श्याम कोगटा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, राहुल सोनवणे, पंचायत समिती सदस्य जनाआप्पा कोळी आदी उपस्थित होते. 

कामाला प्रारंभ
जळगाव शहरातून जाणाऱ्या सुमारे आठ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. तर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पाळधीतून एक मार्ग वळवण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री श्री. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उर्वरित सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच या मार्गावरील विजेचे खांब व इतर उपकरणांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या दोन्ही कामांसाठी १२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून, त्याचेही काम आजपासूनच सुरू करण्यात आले. 

गिरणेवरील समांतर पुलाचे काम 
गिरणा नदीवरील पुलाच्या समांतर एक नवीन पूल उभारणीच्या कामाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपये लागणार असून, या पुलासाठी लवकरच मान्यता मिळेल, असा आशावादही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे महामार्गावरील रहदारीची अडचण दूर होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com