
नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच म्हटले हेाते, की ईडीची नोटीस आली तर त्यास उत्तर देणार. पण तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी काढेल असे देखील खडसेंनी म्हटले होते.
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दोन महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच नाथाभाऊंनी म्हटले होते की ईडीची नोटीस येणार; पण त्यास सक्षमपणे उत्तर देणार. आता ईडीची नोटीस आली असली त्यास नाथाभाऊ सक्षमपणे उत्तर देतीलच; पण जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटीत झाल्याचे पाहून द्वेषापोटी हा प्रकार झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर प्रफुल्ल लोढा यांनी केलेले आरोप आणि त्यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात पाटील म्हणाले, की नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच म्हटले हेाते, की ईडीची नोटीस आली तर त्यास उत्तर देणार. पण तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी काढेल असे देखील खडसेंनी म्हटले होते. आज खडसेंची भेट घेतली असून ते मुंबईकडे रवाना झाले असून, ईडीच्या नोटीसला ते निश्चितच सक्षमपणे उत्तर देतील; असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
लोढावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांच्याबद्दल बोलताना रवींद्र पाटील म्हणाले, की जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटीत झाली आहे. याच द्वेषापोटी असला प्रकार होत आहे. परंतु लोढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा साधा सभासद देखील नाही. त्यांनी खडसेंवर वैयक्तिक आरोप केला त्याचा निषेध व्यक्त करत पाटील यांनी या प्रकरणाच्या कायदेशीर बाबी तपासून लोढांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.