जळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार 

देवीदास वाणी
Thursday, 28 January 2021

एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका झाडाची लाकडे लागतात. पावसाळ्यात लाकडे ओली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

जळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवदाहिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी बुधवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली. जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल राव, प्रकल्पप्रमुख नंदू अडवानी, सचिव रत्नाकर पाटील, आर्थिक सहाय्य करणारे रिखबराज बाफना, दिलीप चोपडा, विनोद जैन, समन्वयक सागर येवले, राजूभाई दोशी, रत्नाकर पाटील उपस्थित होते. 

पर्यावरणाचे रक्षण 
एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका झाडाची लाकडे लागतात. पावसाळ्यात लाकडे ओली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नेरी नाका स्मशानभूमीत आठ ते दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. त्यासाठी रोज मोठ्या प्रमाणावर लाकडे लागतात. या शवदाहिनीमुळे लाकडांची मोठी बचत होईल. 

अशी आहे अत्याधुनिक शवदाहिनी 
ही शवदाहिनी पूर्णपणे एलपीजी गॅसवर कार्यान्वित होईल. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी मृताच्या नातेवाइकांना दोन तासांनी उपलब्ध होतील. रोज शवदाहिनीमध्ये आठ मृतांवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतील. या माध्यमातून खर्चात बचत होईल. एक हजार ५०० रुपये सेवाशुल्क आकारले जाईल. 
 
स्वयंसहाय्यता गटाची निर्मिती 
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅसदाहिनीचे संचालन योग्यरीतीने व्हावे, यासाठी शहरातील विविध समाजातील नागरिकांचा समावेश असलेला स्वतंत्र स्वयंसहायता गट स्थापन केला आहे. या माध्यमातून शवदाहिनीचे संचालन केले जाणार आहे. उद्योजक नंदू अडवानी प्रकल्पप्रमुख आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news new project modern crematorium