जुन्या इमारतीचा स्‍लॅब तोडण्याचे काम सुरू असताना झाला घात; ठेकेदाराचा मृत्‍यू

राजेश सोनवणे
Friday, 22 January 2021

इमारत तोडण्याचे काम आदर्शनगरातील मुख्य रस्त्यावरील आयडीबीआय बँकेजवळ सुरू होते. मागील आठवड्यापासून इमारत तोडण्याचे काम सुरू होते. 

जळगाव : जुने इमारतीचे दुसऱ्या मजल्‍यावरील बांधकाम तोडतांना स्लॉबच्या कात्रीत सापडून ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सदर घटना शहरातील आदर्शनगरात घडली असून, मृत ठेकेदाराच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला.

शहरातील रेणूकानगर (रामेश्‍वर कॉलनी) येथील रहिवासी असलेले आजाबराव रूपचंद चंदनकर (वय-४५) असे मृत ठेकेदाराचे नाव आहे. चंदनकर हे जुन्या इमारतीचे बांधकाम तोडण्याच्या कामाचा ठेका घेत होते. मजूर लावून इमारत तोडण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे इमारत तोडण्याचे काम आदर्शनगरातील मुख्य रस्त्यावरील आयडीबीआय बँकेजवळ सुरू होते. मागील आठवड्यापासून इमारत तोडण्याचे काम सुरू होते. 

स्‍लॅबला तडा अन्‌ झाला घात
दिवसभर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे तोडण्याचे काम सुरू होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ठेकेदार आजाबराव चंदनकर हे काम सुरू असताना खुर्ची टाकून बसलेले होते. त्याच्या बाजूला मजूर हॅमरींग मशीनने स्लॅब फोडत असतांना अचानक स्‍लॅबला मोठा तडा गेल्यामुळे तो मध्यभागातून दुभंगला आणि त्या कात्रित आजाबराव चंदनकर ठेकेदार सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दौलत वंजारी (वय २६) हा मजूर जखमी झाला. 

नातलगांचा मन हेलावणारा आक्रोश
घटना घडल्यानंतर बाजूच्याच खोलीत काम करत असलेला चंदनकर यांचा मुलगा राहूल याने धाव घेत वडीलांना बाहेर काढले. यानंतर त्‍यांना लागलीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रूग्‍णालयात धाव घेत जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी मन हेलवणारा आक्रोश केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news old building crack and contractor death