तहान भागविण्यासाठी खाली उतरला अन्‌ जीवनच संपले; धावत्‍या रेल्‍वेत चढणे पडले महागात

सी. एन. चौधरी | Monday, 11 January 2021

रेल्‍वेस्‍टेशन आले की धावत्‍या रेल्‍वेतून अनेक प्रवाशी उतरत असतात. तर घाईने येत रेल्‍वे सुटल्‍यावर धावत्‍या रेल्‍वेमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रकार करत असतात. हा प्रकार अनेकांच्या जीवावर बेततात. असाच प्रकार पाचोरा रेल्‍वेस्‍थानकावर झाला.

पाचोरा (जळगाव) : पाण्याची बाटली भरण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

लासलगाव (जि. नाशिक) येथील संकेत सोनवणे हा युवक भरतीसाठी गेलेला होता. झेलम एक्सप्रेसने गावी परतत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर गाडी थांबली. यामुळे तो पिण्याच्या पाण्याची बाटली भरण्यासाठी खाली उतरला. बाटली भरण्यास वेळ झाल्याने एक्सप्रेस मार्गस्थ झाली. यामुळे घाई गळबळीत धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय सरकला आणि तो डब्याखाली आला. त्याचा उजवा पाय कापला गेला. 

नातलगांचा आक्रोश
रेल्वे पोलीस दिनेश पाटील यांनी त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटल्याने त्याच्या नातलगांना खबर देण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी वेळी नातलगांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा ठरला. 

Advertising
Advertising

रेल्वेच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू
पाचोरा येथील गाडगेबाबा नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक शरद खैरनार (वय 78) यांचा धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पाचोरा स्थानकावरील रेल्वे कि.मी. क्रमांक 371 जवळ त्यांचा मृतदेह आढळला. या भागात ते पायी फिरण्यासाठी जात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे