कुमारिका माता प्रकरण..आर्थिक आमिषाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्‍न पण तिचे धाडस अन्‌ चौघांसाठी जेलची हवा

crime
crime

पाचोरा (जळगाव) : पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील २० वर्षीय मागासवर्गीय युवतीचे गावातीलच एका महिलेच्या मध्यस्थीने चौघांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून केलेले लैंगिक शोषण त्यातून झालेली गर्भधारणा व तिने गोंडस बालिकेला दिलेला जन्म, हे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारे व समाजमन सुन्न करणारे आहे. याप्रकरणी पीडित कुमारिका मातेने मोठ्या धाडसाने पोलिसांत तक्रार दिल्याने मध्यस्थी महिलेसह चौघे जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पाप चौघांचे, पण बाप कोण? असा प्रश्न उपस्थित होऊन पोलिसांपुढे बाप शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 
धार्मिकदृष्ट्या लौकिक असलेल्या पिंपळगाव हरेश्वर गावात चौघांनी कुमारिकेला माता बनवून गावाच्या पावित्र्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. पिंपळगाव हरेश्वर गावालगतच्या कौली गल्लीत पीडित वीसवर्षीय युवती आपल्या आईसोबत राहते. काही वर्षांपूर्वी पितृछत्र हरपले असल्याने दोघी मायलेकी मोलमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. गावात काही जवळचे नातलगही असल्याने या मायलेकींना जीवन जगण्यासाठी धीर मिळत गेला. या पीडित युवतीवर गावातीलच काहींची वक्रदृष्टी पडली व त्यांनी तिच्या कौमार्याशी खेळून तिला कुमारी असतानाच माता बनवले. 

महिलेची मध्‍यस्‍थी अन्‌ युवतीवर अत्‍याचार
गोपाल पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये महिलेच्या मध्यस्थीने गेल्या अनेक महिन्यांपासून युवतीचे बळजबरीने लैंगिक शोषण केले जात होते. कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावत व मध्यस्थी महिलेच्या वतीने तिच्याशी संबंध ठेवत संशयित चौघांनी तिच्या कौमार्याचे अक्षरशः शोषण केले. त्यातून ती युवती गर्भवती राहिली. युवती गर्भवती आहे, हे गेल्या चार महिन्यांपूर्वीच तिची आई व नातलगांना समजल्याने तिचा गर्भपात करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. 

आर्थिक आमिष दाखवत प्रकरण दडपण्याचा प्रयत्‍न
गावातीलच पीडित युवतीचे नातलग व व्हाइट कॉलर म्हणून मिरविणाऱ्या प्रतिष्ठिताने यात मध्यस्थी केली; परंतु ते अपयशी ठरले व अखेर या कुमारिकेने एका बालिकेला जन्म देऊन ती माता बनली. सिन्नर येथील रुग्णालयात तिच्या नातलगांच्या मदतीने तिची प्रसूती करण्यात आली. तिने मुलीसह तिकडेच राहावे, यासाठीही अनेकांनी प्रयत्न केले. आर्थिक आमिष दाखवण्यात आले. एवढेच नव्हे, तर या पीडित युवतीच्या नातलगांनी संबंधितांशी वेळोवेळी अर्थपूर्ण व्यवहार केल्याचेही दबक्या आवाजात कानी पडले. संशयित चौघांनी बहुतांश प्रतिष्ठित व नातलग यांच्या मदतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. 

तिच्या धाडसाला मिळाला धीर
पीडित कुमारिका मातेने मोठ्या धाडसाने पोलिस ठाणे गाठले. सुदैवाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकारी नीता कायटे या महिलाच असल्याने या पीडितेला मोठा धीर मिळाला. पीडितेच्या तक्रारीनुसार मध्यस्थी महिला समीना तडवी, निंबा सावळे, नीलेश, शिवाजी, गोपाल पाटील, बापू आढाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत हे प्रकरण चव्हाट्यावर आले. या संशयितांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजमनातून संतप्त भावनेने केली जात असली तरी या गोंडस बालिकेचे पालकत्व स्वीकारावे कोणी? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा पोलिसांसह समाजमन प्रयत्न करीत आहे. पाप चौघांचे; पण बाप कोण? हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संघटना आक्रमक 
तालुक्यातील मागासवर्गीय संघटनांसह विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी पीडित कुमारिका मातेच्या न्यायाची मागणी केली असून, पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जाऊन नवजात बालिकेचा बाप कोण? हे निश्चित करून पीडित कुमारिका माता व गोंडस बालिकेला आश्रय व आधार मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com