esakal | मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या; एकाच रात्री तीन ठिकाणी घटना 

बोलून बातमी शोधा

temple robbery}

मंदिरातील पुजारी हरिनारायण मिस्रा नित्यनियमाप्रमाणे सकाळी सहाला संतोषीमाता मंदिर उघडण्यास गेले असता, त्यांना मंदिराचे कुलूप उघडे दिसले. त्यांनी मध्ये जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटी उघडी व पूर्ण रिकामी दिसून आली.

मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या; एकाच रात्री तीन ठिकाणी घटना 
sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) : शहरातील मोठे राम मंदिर, संतोषीमाता मंदिर, झपाट भवानीमाता मंदिरातील दानपेट्या व कपाट फोडून चोरट्यांनी सात हजार ८०० रुपये लंपास केले. या तिन्ही घटना शनिवारी (ता. २७) मध्यरात्री घडल्या. 
शहरातील मध्य वस्तीत असलेले मोठे राम मंदिर, शेजारील संतोषीमाता मंदिरात तसेच झपाट भवानीमातेच्या मंदिरात मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजांचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरी केली. ही घटना शनिवारी (ता. २७) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. मंदिरातील पुजारी हरिनारायण मिस्रा नित्यनियमाप्रमाणे सकाळी सहाला संतोषीमाता मंदिर उघडण्यास गेले असता, त्यांना मंदिराचे कुलूप उघडे दिसले. त्यांनी मध्ये जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटी उघडी व पूर्ण रिकामी दिसून आली. त्यांनी लागलीच राम मंदिराकडे धाव घेतली असता, दरवाजा उघडा आढळून आला तर दानपेटी मंदिराबाहेर उघडी व रिकामी आढळून आली. 

कपाट, दानपेटी उघडलेले
मंदिरातील लोखंडी कपाट ज्यात मंदिरमधील मूर्तीचे वस्र ठेवलेले असतात, तेही उघडे दिसले व कपाटातील सर्व कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून, मंदिराच्या दानपेटीतून चार हजार रुपये, तर मंदिराच्या कपाटातील पंधराशे रुपये, तसेच संतोषीमाता मंदिरातील दानपेटीतून ३०० रुपये, तर झपाट भवानीमाता मंदिरातून दोन हजार रुपये व बेन्टेक्सचे दोन मंगळसूत्र असे एकूण सात हजार ८०० रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद मोठे राम मंदिराचे पुजारी हरिनारायण मिस्रा यांनी पारोळा पोलिस ठाण्याला दिली असून, पारोळा पोलिस तपास करीत आहेत. तसेच शहरातील झपाट भवानीमाता मंदिरातदेखील चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून दानपेटी फुटली नाही; पण परिसराची नासधूस करून नुकसान केले. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

संपादन ः राजेश सोनवणे