सर्व्हरच्या अडचणीमुळे तलाठी सज्‍जांवर दिरंगाई; कार्यालयीन वेळेत सातबारा निघेना

संजय पाटील
Tuesday, 26 January 2021

शासनाने डिजिटल सातबारा तयार करून लोकांना मोठा दिलासा दिलेला असताना सर्व्हरच्या दोषामुळे जनतेला सुविधेपेक्षा असुविधा मिळत आहेत. बॅंक, एसआरओ ऑफिस, इतर खासगी क्षेत्रांत एवढी अडचण पाहावयास मिळत नाही.

पारोळा (जळगाव) : तालुक्यातील सर्वच सजांवर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्व्हरचा वेग अतिशय मंदावल्याने कार्यालयीन वेळेत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. दिरंगाईमुळे शेतकरी व तलाठी यांच्यात अनेकवेळा वादही उद्‌भवत असून, प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 
तालुक्यात ३३ तलाठी सजे असून, २७ ते २८ तलाठी कार्यरत आहेत. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून कार्यालयीन वेळेत प्रत्येक तलाठी सजेवर सातबारा घेण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच फेरफार नक्कल, ‘८ अ’ उताराही लवकर निघत नसल्याने तलाठी व नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. 
शासनाने डिजिटल सातबारा तयार करून लोकांना मोठा दिलासा दिलेला असताना सर्व्हरच्या दोषामुळे जनतेला सुविधेपेक्षा असुविधा मिळत आहेत. बॅंक, एसआरओ ऑफिस, इतर खासगी क्षेत्रांत एवढी अडचण पाहावयास मिळत नाही. परंतु सातबारासाठी वापरले जाणारे सर्व्हर का बंद पडते, याचे कारण काय, याला जबाबदार असणारे यंत्रणेवर कार्यवाही का होत नाही, अशी शंका लोकांच्या मनात येत आहे. 

सातबारा मिळेना : सखूबाई पाटील 
महसुली कामासाठी शेताचा उतारा लागत आहे. परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्व्हरची समस्या असल्यामुळे उतारा घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे फिरावे लागत आहे. तलाठी हे सर्व्हर डाउन असल्याचे सांगत असून, याबाबत तत्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे असून, वेळेवर उतारा मिळाला तरच माझे काम मार्गी लागणार आहे. 

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सर्व्हर कार्यालयीन वेळेत चालत नाही. याबाबत तहसीलदार यांना कळविले आहे. सर्व्हरची अडचण कायमची दूर झाल्यास कामे वेगात होतील व खातेदारांचा रोष पत्करावा लागणार नाही. 
-निशिकांत पाटील, शहर तलाठी 
 
सर्वच कामे ही ऑनलाइन झाल्याने सर्व्हरला तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याबाबत तलाठ्यांशी बोलून, तसेच वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवून लवकरच सर्व्हरची समस्या मार्गी लावली जाईल. शेतकऱ्यांनी याबाबत सहकार्य करावे. 
-अनिल गवांदे, तहसीलदार 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola talathi office server down problem