जळगाव जिल्ह्यात पाच हजार हेक्टर केळीवर करपा; ढगाळ हवामान, थंडीचा फटका 

दिलीप वैद्य
Monday, 11 January 2021

सततचे ढगाळ हवामान किंवा थंडी या दोघांमुळे केळीवर करपा रोगाचा प्रभाव निर्माण होतो. डिसेंबरच्या शेवटच्या १५ दिवसांत तालुक्यात पडलेली थंडी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असलेल्या सततच्या ढगाळ हवामानामुळे तर त्याचा प्रभाव वाढला आहे.

रावेर (जळगाव) : सततचे ढगाळ हवामान आणि यापूर्वी पडलेली थंडी यामुळे नवती केळीबागांवर मोठ्या प्रमाणात करपा पसरला असून, एकट्या रावेर तालुक्यातील दोन हजार ८०० हेक्टर आणि जिल्ह्यातील सुमारे पाच हजार हेक्टर केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. 
आगामी काळातील वाढणारी थंडी पाहता ‘करपा’चा प्रभाव वाढण्याची भीती केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. करपा रोगात केळीची पाने वाळतात, त्यावर ठिपके पडतात. त्यामुळे केळीची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते. सततचे ढगाळ हवामान किंवा थंडी या दोघांमुळे केळीवर करपा रोगाचा प्रभाव निर्माण होतो. डिसेंबरच्या शेवटच्या १५ दिवसांत तालुक्यात पडलेली थंडी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असलेल्या सततच्या ढगाळ हवामानामुळे तर त्याचा प्रभाव वाढला आहे. विशेषतः मे आणि जूनमध्ये लागवड झालेल्या नवती केळीबागेवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. 

घडाचे वजन होते कमी
सध्या तालुक्यात किमान दोन हजार ८०० क्षेत्रावरील केळीवर करपा पसरला आहे, तर जिल्ह्यात हे प्रमाण सुमारे पाच हजार हेक्टर असावे, अशी भीती आहे. करप्यामुळे केळीच्या घडाचे वजन कमी येते आणि दर्जाही काही प्रमाणात खालावतो, असे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात थंडी वाढल्यास करपा आणखी आपले हातपाय पसरेल, अशी भीती आहे. 

ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सुरू केलेल्या केळी करपा निर्मूलन योजनेतील निधी शिल्लक आहे, तो उपलब्ध करून देऊन करपा निर्मूलनासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानावर करपा निर्मूलनाची औषधी उपलब्ध करून द्यावी. 
- दुर्गादास पाटील, केळी उत्पादक शेतकरी, निंभोरा, ता. रावेर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver five thousand hectares of bananas karapa