‘हाय कमांड’च्या आदेशाने शिरीष चौधरी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी 

दिलीप वैद्य
Friday, 5 February 2021

महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रासाठी १ अध्यक्ष, ५ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचीही उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रावेर (जळगाव) : महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरीष चौधरी यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्यासाठी काँग्रेसचे राज्‍य उपाध्यक्षपद कायम राहिले आहे. 
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी आणि खासदार के. सी. वेणुगोपालन यांनी याबाबत आज (ता. ५) महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रासाठी १ अध्यक्ष, ५ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचीही उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्ती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केल्याचे नमूद करण्यात आले असून या नियुक्तीस संसदीय समितीची मान्यता असल्याचेही पत्रात म्हटले आहे. याआधीच्या कार्यकारिणीत डॉ. उल्हास पाटील हेदेखील प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष होते. 

पक्षाचे एकनिष्ठ शिलेदार 
रावेर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे शिरीष चौधरी हे काँग्रेसचे एकनिष्‍ठ शिलेदार आहेत. त्यांचे वडील मधुकरराव चौधरी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री व विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले होते. तर, शिरीष चौधरी रावेर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. यामुळे पक्षाने त्‍यांच्यावर विश्‍वास टाकत राज्‍य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. 

 

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची संघटना अधिक बळकट करून ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वास आणि ताकद देण्यासाठी आपण प्रयत्न करू. निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ज्या विचारांवर निष्ठा ठेवून मी काँग्रेससोबत आहे; त्या पक्षाची सेवा करण्याची ही संधी मिळाली आहे असे मी समजतो. या नियुक्तीचा मला आनंद आणि अभिमानही आहे. 
- शिरीष चौधरी, आमदार

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver vidhansabha mla shirish choudhari state vice president in congress