
१९ वर्षीय महिलेवर रुग्णालयात ‘सिझर’ शस्त्रक्रिया केली. माता व बाळ दोघांचीही तब्बेत सुखरूप असल्याची माहिती डॉ. अभिजित सरोदे यांनी दिली.
न्हावी (ता. यावल) : येथील ग्रामीण रुग्णालयात २१ वर्षांनंतर प्रथमच सिझेरियन शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर माता आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. रुग्णालयात सिझरची सुविधा निर्माण झाल्याने ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे.
वैद्यकीय अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित सरोदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनिशा रुबाब तडवी या १९ वर्षीय महिलेवर रुग्णालयात ‘सिझर’ शस्त्रक्रिया केली. माता व बाळ दोघांचीही तब्बेत सुखरूप असल्याची माहिती डॉ. अभिजित सरोदे यांनी दिली.
डॉ. सरोदे यांच्यासह सहाय्यक डॉ. बी. बी. बारेला, डॉ. प्रफुल्ल पाटील, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद पाटील, डॉ. कौस्तुभ तळेले, अधिपरिचारिका रीता धांडे यांच्या चमूने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे ‘सिझर’ची सुविधा गर्भवती महिलांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामस्थांची झाली सोय
गर्भवती महिलांना त्रास होवू लागल्यानंतर बऱ्याचदा सिझर करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु, ग्रामीण रूग्णालय असताना देखील सिझरची सुविधा नसल्याने तशा क्रिटीकल परिस्थितीत गर्भवतींना भुसावळ किंवा जळगाव आणले जात असे. यात रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. परंतु, आता सिझरची सुविधा झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील गर्भवती महिलांचा त्रास वाचणार आहे.